LatestNewsगोंदिया- भंडारामहाराष्ट्र

देवरी तालुक्यात खळबळ: बिअर बारविरोधात महिलांचा आत्मदहनाचा इशारा!…

धोबाटोला येथील ग्रामस्थांचा संताप; प्रशासकीय यंत्रणेकडे सामूहिक विषप्राशनाचा इशारा देत निवेदनाद्वारे दिली तक्रार
देवरी = तालुक्यातील धोबाटोला (गट ग्रामपंचायत उचेपूर) येथे नव्याने सुरू झालेल्या ‘अरमान बिअर बार अँड रेस्टॉरंट’ विरोधात स्थानिक महिला आणि ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. या बारमुळे गावात अशांतता पसरली असून, वारंवार तक्रार करूनही तो बंद होत नसल्याने संतप्त महिलांनी आता प्रशासनाला सामूहिक विषप्राशन करून आत्मदहन करण्याचा टोकाचा इशारा दिला आहे. आज दिनांक 5 मार्च रोजी उपविभागीय अधिकारी देवरी यांना दिलेल्या या धक्कादायक निवेदनामुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
मिळालेल्या माहितीनुसार, धोबाटोला येथे निलेश मंगलचंद साहु यांच्या मालकीचा ‘अरमान बिअर बार’ २६ नोव्हेंबर २०२५ रोजी सुरू करण्यात आला. या बारला ग्रामसभेचा तीव्र विरोध होता. ग्रामस्थांचा आरोप आहे की, हा बार सुरू झाल्यापासून गावात मद्यपींचा सुळसुळाट वाढला असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या विरोधात ग्रामस्थांनी २७ नोव्हेंबर २०२५ पासून सतत धरणे आंदोलन आणि प्रशासनाकडे पाठपुरावा केला, परंतु अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.
गंभीर आरोप आणि प्रशासनाचे दुर्लक्ष
उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात महिलांनी अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. बार मालक आणि त्यांच्या समर्थकांकडून ग्रामसभेच्या सदस्यांना धमकावणे, अश्लील शिवीगाळ करणे आणि आंदोलनात सहभागी महिलांवर चारचाकी गाडी अंगावर घालण्याचा प्रयत्न करणे, अशा घटना घडल्याचे तक्रारीत नमूद आहे.
विशेष म्हणजे, १७ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री उशिरा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली असता, ग्रामस्थांचे मोबाईल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केल्याचा आणि दमदाटी केल्याचा खळबळजनक आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये प्रशासनाविषयी तीव्र अविश्वास निर्माण झाला आहे.
दोन गटांत विभागले गाव..
बिअर बारच्या मुद्द्यावरून पूर्वी शांत असलेल्या धोबाटोला आणि उचेपूर गावात आता दोन तट पडले आहेत. एकीकडे बारला विरोध करणारे सुमारे ७०० हून अधिक ग्रामस्थ आहेत, तर दुसरीकडे बार समर्थक आणि त्यांचे नातेवाईक यांच्यात सातत्याने संघर्ष होत आहे. १८ फेब्रुवारी रोजी झालेल्या ग्रामसभेतही बार मालकाच्या नातेवाईकांनी गोंधळ घालून सभा उधळण्याचा प्रयत्न केल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
आता आमचे शेवटचे पाऊल…..”
आंदोलन करूनही न्याय मिळत नसल्याने हताश झालेल्या महिलांनी निवेदनाच्या शेवटी म्हटले आहे की, “आम्ही घरून विष घेऊन आलो आहोत. जर या बारवर तातडीने कारवाई झाली नाही, तर आम्ही सर्व महिला सामूहिक विषप्राशन करून आत्मदहन करू. हाच आमचा शेवटचा मार्ग असेल.”
या निवेदनावर शेवंता गाठणे, मंगलीबाई नेताम, फुलबसंन मडावी यांच्यासह २३ हून अधिक महिलांच्या स्वाक्षऱ्या आणि अंगठ्याचे ठसे आहेत. सदर निवेदनाच्या प्रती तहसीलदार, उपविभागीय पोलीस अधिकारी आणि चिचगड पोलीस ठाण्यालाही पाठवण्यात आल्या आहेत.
शासन प्रशासन दखल घेणार का?
एकीकडे राज्य सरकार महिला सुरक्षेच्या गप्पा मारत असताना, दुसरीकडे एका बिअर बारमुळे संपूर्ण गावाची शांतता भंग पावत असून महिलांना आत्मदहनासारखा निर्णय घ्यावा लागत आहे. आता शासन प्रशासन याकडे गांभीर्याने बघते की पुन्हा कागदी घोडे नाचवले जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *