Railway News: आरएच गर्डर डी-लॉन्चिंग कामामुळे अनेक प्रवासी गाड्या रद्द; काही गाड्यांचे संचालन प्रभावित
गोंदिया : दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळांतर्गत बोरतलाव–दरेकसा तसेच गुदमा–गोंदिया रेल्वे मार्गावर आरएच गर्डर डी-लॉन्चिंगचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामामुळे काही प्रवासी गाड्यांचे संचालन तात्पुरते प्रभावित होणार असून अनेक मेमू गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
रेल्वे प्रशासनाच्या (Railway News) माहितीनुसार समपार फाटक क्रमांक 481 (किमी 948/19-21) बोरतलाव–दरेकसा रेल्वे मार्गावर तसेच समपार फाटक क्रमांक 504 (किमी 991/20-22) गुदमा–गोंदिया रेल्वे मार्गावर 6 ते 7 मार्च दरम्यान ट्रॅफिक कम पावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. रेल्वे सुरक्षेला बळकटी देणे आणि पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने हे काम करण्यात येत आहे.
नियोजित वेळापत्रकानुसार 6 मार्च रोजी रात्री 11 वाजल्यापासून 7 मार्च रोजी पहाटे 2 वाजेपर्यंत डाउन लाईनवर सुमारे 3 तासांचा ब्लॉक राहणार आहे. तर 6 मार्च रोजी रात्री 11 वाजल्यापासून 7 मार्च रोजी पहाटे 2.30 वाजेपर्यंत अप लाईनवर 3 तास 30 मिनिटांचा ब्लॉक राहणार आहे. या कालावधीत रेल्वे वाहतुकीवर परिणाम होणार आहे.
या कामामुळे काही मेमू गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये रायपूर–डोंगरगड मेमू (68721), डोंगरगड–गोंदिया मेमू (68723), दुर्ग–गोंदिया मेमू (68741), गोंदिया–दुर्ग मेमू (68742), गोंदिया–नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी मेमू (68743), नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी–गोंदिया मेमू (68744), डोंगरगड–गोंदिया मेमू (68711), गोंदिया–नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी मेमू (68713), नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी–गोंदिया मेमू (68716), गोंदिया–डोंगरगड मेमू (68712), (Railway News) बालाघाट–नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी मेमू (68715) आणि नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी–बालाघाट मेमू (68714) या गाड्यांचा समावेश असून या गाड्या 6 व 7 मार्च रोजी रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच गोंदिया–रायपूर मेमू (68724) ही गाडी 7 व 8 मार्च रोजी रद्द करण्यात आली आहे. याशिवाय टाटानगर–इतवारी एक्सप्रेस (18109) ही गाडी दुर्ग ते बोरतलाव दरम्यान तसेच कोरबा–इतवारी एक्सप्रेस (18239) ही गाडी 6 मार्च रोजी दुर्ग ते बोरतलाव दरम्यान नियंत्रित करण्यात येणार आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना प्रवास करण्यापूर्वी संबंधित गाडीची अद्ययावत माहिती तपासूनच प्रवास करण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागू नये.

