तहसील कार्यालयातील सहायक महसूल अधिकारी लाच घेताना रंगेहात जाळ्यात
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची यशस्वी सापळा कारवाई
गोंदिया : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) गोंदिया यांनी केलेल्या सापळा कारवाईत देवरी तहसील कार्यालयातील सहायक महसूल अधिकारी संदेश नैनदास बोरकर (वय 39) यांना 1,500 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई 13 फेब्रुवारी 2026 रोजी करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, देवरी येथील सर्वे क्रमांक 309/1/ब मधील ओपन स्पेसवर झालेल्या कथित अवैध बांधकामाबाबत तक्रारदार व स्थानिक नागरिकांनी विविध शासकीय कार्यालयांकडे पाठपुरावा केला होता. संबंधित प्रकरण उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आले होते. न्यायालयाच्या आदेशानुसार चौकशी करून अहवाल सादर करण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान, तक्रारदार 12 फेब्रुवारी रोजी तहसील कार्यालयात चौकशीसाठी गेले असता आरोपी अधिकारी बोरकर यांनी त्यांच्या बाजूने चौकशी अहवाल तयार करून देण्यासाठी 2,000 रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. त्यानंतर 13 फेब्रुवारी रोजी फोनद्वारे पैसे घेऊन येण्यास सांगितल्याने तक्रारदारांनी लाच देण्यास नकार देत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, गोंदिया येथे तक्रार नोंदवली. देवरी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कलम 7 अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक उमाकांत उगले (सापळा अधिकारी) व पोलीस निरीक्षक अरविंद राऊत यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. कारवाईस मा. डॉ. दिगंबर प्रधान (पोलीस अधीक्षक, ACB नागपूर परिक्षेत्र) व अपर पोलीस अधीक्षक माधुरी बाविस्कर आणि विजय माहुलकर यांचे मार्गदर्शन लाभले.
पडताळणीत मागणी स्पष्ट : ACB पथकाने पंचांसमक्ष केलेल्या पडताळणीत आरोपीने तडजोडीअंती 1,500 रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर रचलेल्या सापळ्यात आरोपीने लाच रक्कम स्वीकारताच पथकाने त्याला ताब्यात घेतले.
मोबाईल व पुरावे जप्त : कारवाईदरम्यान आरोपीकडून 1,500 रुपयांची लाच रक्कम, संबंधित कागदपत्रे, व्हॉट्सअॅप चॅटचे स्क्रीनशॉट तसेच सुमारे 5,000 रुपये किमतीचा मोबाईल जप्त करण्यात आला असून घरझडतीची प्रक्रिया सुरू आहे.
नागरिकांना आवाहन : कोणत्याही शासकीय कामासाठी कायदेशीर शुल्काव्यतिरिक्त लाचेची मागणी झाल्यास नागरिकांनी अँटी करप्शन ब्युरो, गोंदिया येथे तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. टोल फ्री क्रमांक 1064 वरही तक्रार नोंदवता येणार आहे.

