गृह राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर यांची पोलीस अधीक्षक कार्यालयाला भेट
गोंदिया : राज्याचे गृह (ग्रामीण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार, खनिकर्म विभागाचे राज्यमंत्री आज जिल्ह्याच्या दौऱ्यावर असतांना त्यांनी गोंदिया येथे पोलीस अधीक्षक कार्यालयाला भेट देवून पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांच्याकडून जिल्ह्यातील शांतता व सुरक्षीतता बाबत आढावा घेतला. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष लायकराम भेंडारकर, आमदार विनोद अग्रवाल, पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
राज्यमंत्री श्री. भोयर म्हणाले, जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील आदिवासी बांधवांचे श्रध्दास्थान असलेल्या कचारगड येथे 1986 पासून यात्रा भरते. कचारगड येथील पारी कोपार लिंगो माँ काली कंकालीच्या यात्रेला येत्या 30 जानेवारीपासून सुरुवात होत आहे. ही यात्रा पाच दिवस चालणार असून विविध राज्यातून आदिवासी बांधव या यात्रेत सहभागी होणार आहेत. यात्रेदरम्यान येणाऱ्या भाविकांना कोणतीही अडचण निर्माण होणार नाही यासाठी पोलीस प्रशासनाने कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाही याची दक्षता घ्यावी. यात्रेदरम्यान भाविकासांठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, टॉयलेटची व्यवस्था, हिरकणी कक्ष स्थापन करण्यात यावा असेही त्यांनी यावेळी सांगितले. पोलीस अधीक्षक श्री. भामरे म्हणाले, कचारगड यात्रेदरम्यान सी-60 चे तीन पथक राहणार आहेत. अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, उपअधीक्षक आमगाव प्रमोद मडामे, उपअधीक्षक देवरी विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनात जवळपास 300 अंमलदार यात्रेदरम्यान बंदोबस्तात उपस्थित राहणार आहेत असे त्यांनी सांगितले.

