अल्पसंख्याक समुदायाला सहकार्य करण्यास प्रशासन तत्पर : निवासी उपजिल्हाधिकारी भैय्यासाहेब बेहेरे
जिल्ह्यात अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा
गोंदिया : संयुक्त राष्ट्र संघाने 18 डिसेंबर 1992 रोजी राष्ट्रीय वांशिक, धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्याकांच्या हक्काचा जाहीरनामा स्वीकृत करुन प्रस्तृत केला आहे. त्यानुसार अल्पसंख्याक समुदायाला त्यांची संस्कृती, भाषा, धर्म, परंपरा इत्यादींचे संवर्धन करता यावे यासाठी अल्पसंख्याक समुदायाला सहकार्य करण्यास जिल्हा प्रशासन तत्पर आहे, असे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी भैय्यासाहेब बेहेरे यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात (ता.18) अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा करण्यात आला, त्यावेळी ते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. यावेळी उपजिल्हाधिकारी (सामान्य) मानसी पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी विजय अवधाने, जिल्हा नियोजन अधिकारी तथा जिल्हा अल्पसंख्याक अधिकारी मुरलीनाथ वाडेकर, जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिक्षक धनंजय देशमुख, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी डॉ.रुपेशकुमार राऊत उपस्थित होते.
यावेळी श्री. बेहेरे यांनी अल्पसंख्याक हक्क दिवसाचे महत्व विशद करताना केंद्र शासनाद्वारे अल्पसंख्याक समुदायाकरीता राबविण्यात येत असलेल्या 15 कलमी कार्यक्रमासहीत महाराष्ट्र शासनाद्वारे विद्यार्थी, बेरोजगार, महिला आदींसाठी राबविण्यात येत असलेल्या योजनांची सविस्तरपणे माहिती विशद केली. तसेच अल्पसंख्याक समुदायातील सदस्यांनी उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन जिल्हा प्रशासन आपल्याला सहकार्य करण्यास तत्पर आहे असे त्यांनी यावेळी आश्वासीत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा नियोजन अधिकारी तथा अल्पसंख्याक अधिकारी मुरलीनाथ वाडेकर यांनी केले. प्रास्ताविकातून त्यांनी अल्पसंख्याक समुदायांच्या सांस्कृतिक, धार्मिक आणि वांशिक विविधतेचे जतन करण्याच्या गरजेबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी 18 डिसेंबर हा दिवस दरवर्षी अल्पसंख्याक हक्क दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. भेदभाव न करता आणि समानतेचे त्यांचे हक्क संरक्षीत राहण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करते, असे अल्पसंख्याक हक्क दिवसाचे महत्व त्यांनी विशद केले. कार्यक्रमास उपअधिक्षक सीमा वानखेडे, सहायक संशोधन अधिकारी गणेश बिनेकर, सत्यवान उईके, तुळशीदास झंझाड, सांख्यिकी सहायक देवानंद कुंभारे, मंगेश लिमजे यांच्यासह अल्पसंख्याक समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

