आमदार सांस्कृतिक महोत्सव जनतेला ही सांस्कृतिक मेजवानी : आ.बडोले
नवेगावबांध : अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात भारतीय लोकसंस्कृतीचे जतन व संवर्धन करण्याच्या उद्देशाने अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार व माजी मंत्री राजकुमार बडोले यांच्या पुढाकाराने’ आमदार सांस्कृतिक महोत्सव २०२५’ चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. पावा लाईव्ह म्युझिक अँड मेडिटेशन, दांडिया व पारंपारिक लोकनृत्य स्पर्धेचे आयोजन हे या महोत्सवाचे आकर्षण राहणार आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने मतदार संघातील जनतेला एक सांस्कृतिक मेजवानी मिळणार आहे, असे आ.राजकुमार बडोले यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र राज्यात आमदार सांस्कृतिक महोत्सव हे पहिल्यांदाच अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात आपल्या वतीने आयोजित करण्यात येत आहे. अशी माहिती येथील शासकीय विश्रामगृहावर झालेल्या पत्रकार परिषदेत आ.राजकुमार बडोले यांनी दिली आहे.पाच दिवसीय सांस्कृतिक महोत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी महायुतीचे घटक पक्षांच्या मतदार संघातील पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांच्या समित्या स्थापन करण्यात आले आहे. महायुतीच्या सर्व घटक पक्षांच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी हा महोत्सव यशस्वीरित्या पार पडण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही आमदार बडोले यांनी महायुतीच्या घटक पक्षाच्या पदाधिकार्यांना यावेळी केले. आपल्या मतदारसंघात दिवाळी झाल्यानंतर मंडईचे आयोजन होते. सगळीकडे उत्साहाचे वातावरण असते. गावागावात नाटक व विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे मोठ्या प्रमाणावर आयोजन केले जाते. महाराष्ट्रात या काळात हे उत्साहवर्धक वातावरण महाराष्ट्रात हे आपल्याकडेच असते, असेही आमदार बडोले यावेळेस पुढे म्हणाले.या महोत्सवा अंतर्गत २१ डिसेंबर रोजी सायंकाळी ६.०० वाजता जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय अर्जुनी मोरगाव येथे पारंपारिक लोक नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. २२ डिसेंबर रोजी प्रसिद्ध कीर्तनकार शिवलीला पाटील यांचा सुमधुर कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. २३ डिसेंबर रोज मंगळवारला सुप्रसिद्ध गायक सवाई भट्ट यांचा लाईव्ह कॉन्सर्ट होऊन महोत्सवाची सांगता होणार आहे. अर्जुनी मोरगाव येथे जिल्हा परिषद हायस्कूलच्या पटांगणावर हे सांस्कृतिक महोत्सवाचे कार्यक्रम २१ ते २३ डिसेंबर दरम्यान सायंकाळी सहा वाजता संपन्न होणार आहेत. या महोत्सवाचे आयोजन अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार व माजी मंत्री राजकुमार बडोले यांच्या मार्गदर्शनाखालील आमदार सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे . या महोत्सवात १५० पेक्षा अधिक कलाकारांचा सहभाग असणार असून, भारतीय लोकसंस्कृतीचे रंगमंचावर भव्य दर्शन घडणार आहे. तसेच या महत्त्वाच्या निमित्ताने महायुतीच्या घटक पक्षांचे नेते पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्र येऊन समन्वयाने यापुढे काम करतील. असा विश्वासही यावेळी आमदार बडोले यांनी व्यक्त केला आहे.पत्रकार परिषदेला माजी जि.प.उपाध्यक्ष यशवंत गणवीर, अविनाश काशीवार, लोकपाल गहाणे, प्रकाश गहाणे, राधेश्याम भेंडारकर, किशोर तरोणे, रजनीताई गिरेपुंजे, मंजुषा बारसागडे, शैलेश जायस्वाल, प्रकाश शहारे, राजेश कठाणे, रमेश चुरे, विश्वजीत डोंगरे, हितेश डोंगरे, ममता भैय्या, रूपाली टेंभुर्णे यांच्यासह नेते कार्यकर्ते उपस्थित होते.

