LatestNewsगोंदियाविदर्भ

आमगावात दहीहंडी उत्सवादरम्यान भीषण दुर्घटना; जिन्याचा स्लॅब कोसळून १८ जण जखमी, ६ गंभीर!

‘अष्टविनायक दहीहंडी’ पाहण्यासाठी उसळली होती अलोट गर्दी

आमगाव (गोंदिया) : आमगाव शहरात आयोजित प्रसिद्ध ‘अष्टविनायक दहीहंडी उत्सवा’च्या जल्लोषात अचानक काळाने घाला घातला. दहीहंडी फोडण्याचा थरार शिगेला पोहोचलेला असतानाच, कार्यक्रम पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केलेल्या इमारतीच्या जिन्याचा स्लॅब अचानक पत्त्याच्या बंगल्यासारखा भरभरून कोसळल्याची भीषण दुर्घटना घडली. या दुर्घटनेत तब्बल १८ नागरिक जखमी झाले असून, त्यापैकी ६ जण गंभीर जखमी झाले आहेत. गंभीर जखमींना तातडीने अधिक उपचारासाठी गोंदिया येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यातील दोघांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, रविवार, ६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ८ वाजेच्या सुमारास आमगाव येथील अष्टविनायक दहीहंडी उत्सव पाहण्यासाठी हजारो भाविक व नागरिकांची अलोट गर्दी उसळली होती. चौकात दहीहंडीचे मानवी थर रचले जात असताना, चांगल्या प्रकारे दृश्य दिसावे म्हणून परिसरातील इमारतींच्या जिन्यांवर आणि उंचावर नागरिक उभे होते. दरम्यान, एका इमारतीच्या भिंतीला लागून असलेल्या जिन्याच्या स्लॅबवर प्रमाणापेक्षा जास्त नागरिक उभे राहिले. अचानक भार न पेलवल्याने हा सिमेंटचा भलामोठा स्लॅब थेट खाली कोसळला.स्लॅब कोसळताच एकच आक्रोश अन् पळापळ!स्लॅब कोसळताच त्यावर उभे असलेले आणि खाली उभे असलेले अनेक जण थेट मलब्याखाली गाडले गेले. क्षणात उत्सवाच्या जल्लोषाचे रूपांतर भीषण किंकाळ्या आणि आक्रोशात झाले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे घटनास्थळी मोठी धावपळ आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेचे गांभीर्य ओळखून स्थानिक नागरिक, मंडळाचे स्वयंसेवक आणि उपस्थित पोलीस प्रशासनाने तात्काळ बचावकार्य हाती घेतले. मलब्याखाली दबलेल्या जखमींना तातडीने बाहेर काढून उपचारासाठी पाठवण्यात आले. १२ जणांना प्राथमिक उपचारानंतर डिस्चार्ज; ६ जण जिल्हा रुग्णालयात!सर्व १८ जखमींना तातडीने आमगाव येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे वैद्यकीय पथकाने तातडीने प्रथमोपचार केले. यापैकी किरकोळ जखमी झालेल्या १२ जणांना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले, तर डोक्याला व शरीराला गंभीर दुखापत झालेल्या ६ जणांना तात्काळ १०८ रुग्णवाहिकेद्वारे गोंदिया जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले. गोंदिया जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांच्या माहितीनुसार, ६ गंभीर जखमींपैकी दोघांची प्रकृती नाजूक असून तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक त्यांच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून आहे.दहीहंडी उत्सवादरम्यान सुरक्षेच्या उपायांकडे आणि जुन्या इमारतींच्या क्षमतेकडे दुर्लक्ष झाल्यामुळे ही दुर्दैवी दुर्घटना घडल्याचे बोलले जात असून, या घटनेमुळे आमगाव परिसरासह संपूर्ण गोंदिया जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *