LatestNewsमहाराष्ट्र

काँग्रेस नगरसेवक शुभम मोटघरे यांच्या घरावर गोळीबार!

दोन फेऱ्या झाडून दुचाकीस्वार पसार; शहरात खळबळ, मोटघरे कुटुंब सुखरूप
काँग्रेस व भाजप नेत्यांची घटनास्थळी धाव; आरोपींच्या अटकेची जोरदार मागणी
देशोन्नती वृत्तसेवा
नागपूर : प्रभाग-२७ चे काँग्रेस नगरसेवक शुभम शेषराव मोटघरे (३५) यांच्या घरावर मंगळवारी उशिरा रात्री अज्ञात दुचाकीस्वारांनी दोन फेऱ्या झाडून गोळीबार केला. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही, मात्र या प्रकारामुळे संपूर्ण शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे. शुभम मोटघरे हे भांडेवाडी ठाण्याच्या हद्दीतील वाठोडा परिसरात राहतात. त्यांच्या घराच्या तळमजल्यावर जनसंपर्क कार्यालय असून पहिल्या मजल्यावर कुटुंब राहते.
मंगळवारी रात्री १२.५० वाजताच्या सुमारास शुभम मोटघरे कामावरून घरी परतले. ते घरात प्रवेश करत असतानाच बाहेर अचानक गोळीबाराचा आवाज झाला. पहिली गोळी घराच्या गॅलरीला, तर दुसरी गोळी खिडकीच्या काचांवर लागली. मोटघरे यांनी बाहेर येऊन पाहिले असता तोंडाला स्कार्फ बांधलेले दोन दुचाकीस्वार वेगाने पळून जाताना दिसले.
घटनेची माहिती मिळताच भांडेवाडीचे ठाणेदार नितीन चरडे यांच्यासह डीआयजी राजेंद्र दाभाडे, वसंत परदेशी, डीसीपी दीपक अग्रवाल व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना घटनास्थळावरून दोन रिकाम्या पुंगळ्या (खोके) सापडल्या आहेत. फॉरेन्सिक टीम आणि क्राईम ब्रँचचे पथक आरोपींचा शोध घेत आहे.
राजकीय नेत्यांकडून हल्ल्याचा निषेध
घटना घडताच आमदार विकास ठाकरे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन सीपी विश्वास नांगरे पाटील यांच्याशी फोनवरून संपर्क साधला व आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली. बुधवारी सीपी नांगरे पाटील यांनी स्वतः घटनास्थळाची पाहणी करून तपासाचे आश्वासन दिले.
तसेच माजी मंत्री नितीन राऊत, आमदार कृष्णा खोपडे आणि नगरसेवक बंटी कुकडे यांनीही मोटघरे यांची भेट घेऊन या भ्याड हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला.
CCTV फुटेजची तपासणी सुरू
पोलिसांनी परिसरातील अनेक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले असून, त्यात दोन आरोपी गुन्हा करून पळताना दिसत आहेत. मात्र रात्र असल्याने व वाहनाची नंबर प्लेट स्पष्ट नसल्याने ओळख पटवण्यात अडचणी येत आहेत. मोटघरे यांनी आपले कोणाशीही वैर नसल्याचे स्पष्ट केले असून पोलीस सर्व कोनांतून तपास करत आहेत.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *