LatestNewsगोंदिया- भंडारामहाराष्ट्र

सुफलाम कंपनीचा मनमर्जी कारभारावर ब्रेक लावा

माजी आमदार कोरोटे यांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन
देवरी :
शहरालगत असलेल्या एमआयडीसी परिसरात सुफलाम कंपनीचा कारभार सुरू आहे. परंतु, कंपनीचा मनमर्जी कारभार परिसरातील गावांसाठी डोकेदुखीचा केंद्र होत आहे. यामुळे शेतकरी व सर्वसामान्य गावकरी चांगलेच अडचणीत आले आहे. कंपनीमधून निघणारे विषारी वायु व रसायनयुक्त पाण्याने अनेक गावातील पिक, जनावर व नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम करीत आहेत. यामुळे प्रशासनाने याची दखल घेवून सुफलाम कंपनीचा सुरू असलेल्या मनमर्जी कारभारावर ब्रेक लावावा, अशी मागणी माजी आमदार तथा शिवसेना आदिवासी विभागाचे प्रदेशाध्यक्ष सहषराम कोरोटे यांनी केली आहे. या संदर्भात आज (ता.१७) जिल्हाधिकारी यांची भेट घेवून मागणीचे निवेदन दिले.
देवरी एमआयडीसी परिसरात सुफलाम कंपनी थाटण्यात आली आहे. कंपनीच्या माध्यमातून परिसरातील नागरिकांना रोजगार कमी समस्या जास्त दिली जात आहे. कंपनीचा कामकाज सुरू असताना निघणारे विषारी वायु परिसरात प्रदूषण निर्माण करीत आहे. यामुळे पिक व वनस्पतींवर परिणाम होत असून समस्या निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे. तर कंपनीकडून रसायनयुक्त पाणी भागी नाल्यात सोडले जात आहे. यामुळे नाल्यातील स्वच्छ पाणी दुषित होवून जनावरांचे आरोग्य बिघडत चालले आहे. शिवाय अनेक शेतकरी भागी नाल्यातील पाण्यावर सिंचनाची सोय करतात, अशा विषारी पाण्यामुळे पिकांवर परिणाम पडत असून जमिनीची सुपिकताही धोक्यात आली आहे. सुफलाम कंपनीच्या या भोंगळ कारभाराचा फटका परिसरातील शिलापुर, डवकी, बोरगाव, नवाटोला, गोटाबोडी, भागी, वराडघाट, जांभुरडंड आदि गावातील नागरिकांना भोगावा लागत आहे. एंकदरीत रसायनयुक्त पाणी व विषारी वायुच्या प्रकोपाने परिसरातील वातावरण बिघडत चालले आहे. या संदर्भात गावकर्‍यांकडून तक्रार करण्यात येत असली तरी कंपनी प्रशासन आपल्या आडमुठे धोरणावर कायम आहे. परिणामी या गंभीर प्रकाराची दखल घेवून सुफलाम कंपनीच्या मनमर्जी कारभारावर ब्रेक लावावा, अशी मागणी शिवसेना आदिवासी विभागाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार सहषराम कोरोटे यांनी केली आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी प्रजित नायर यांची भेट घेवून मागणीचे निवेदन सादर केले. यावेळी माजी आमदार कोरोटे यांच्यासोबत राजीक खान, मधुकर साखरे, रूपचंद जांभुळकर, जैपाल प्रधान, नरेश राऊत, सचिन मेळे, वैâलाश घासले, कालिराम किरसान आदिंसह शेतकरी उपस्थित होते.
…………………
सात दिवसाचे अल्टीमेटम अन्यथा आंदोलन
सुफलाम कंपनीतून निघणारा विषारी धुर व रसायनयुक्त पाण्यामुळे शिलापुर, डवकी, बोरगाव, नवाटोला, गोटाबोडी, भागी, वराडघाट, जांभुरडंड आदि गावांना फटका बसत आहे. पिकांवर परिणाम होवून जमिनीची सुपिकता धोक्यात आली आहे. शिवाय विषारी पाण्यामुळे जनावरांच्या आरोग्यावर परिणाम होत चालला आहे. या प्रकारामुळे धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे जिल्हा प्रशासनाने दखल घेवून विषारी वायु व रसायनयुक्त पाण्याची समस्या सात दिवसात मार्गी लावावी, अन्यथा परिसरातील गावकरी, शेतकर्‍यांना सोबत घेवून आंदोलनावर बसणार, असा इशाराही माजी आमदार सहषराम कोरोटे यांनी दिला आहे. यामुळे आता प्रशासनाच्या भुमिकेकडे तालुकावासीयांचे लक्ष लागले आहे.
०००००००००

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *