LatestNewsगोंदिया- भंडारामहाराष्ट्रविदर्भ

‘इंटरसेप्टर’चा धडाका; ९७५ वाहनांवर आरटीओचा बडगा!

५ महिन्यांत १९.५० लाखांचा दंड वसूल, दुचाकीस्वार रडारवर!
गोंदिया (प्रतिनिधी):
रस्त्यावर सुसाट धावणाऱ्या आणि वाहतूक नियमांना केराची टोपली दाखवणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांवर गोंदिया आरटीओ आणि वाहतूक पोलिसांनी आपला मोर्चा वळवला आहे. आरटीओच्या ताफ्यातील अत्याधुनिक रडार आणि लेझर कॅमेरा यंत्रणेने सज्ज असलेल्या ‘इंटरसेप्टर’ वाहनाने नियमबाह्य वाहन चालवणाऱ्या ९७५ वाहनांना अचूक टिपले आहे. यामध्ये नेहमीप्रमाणे दुचाकीचालकांची संख्या सर्वाधिक असून, १ जानेवारी ते १२ जून २०२६ या पाच महिन्यांच्या कालावधीत ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. या धडक मोहिमेच्या माध्यमातून वाहतूक पोलिसांनी नियम तोडणाऱ्या वाहनचालकांकडून तब्बल १९ लाख ५० हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. ‘इंटरसेप्टर’च्या ऑनलाइन चालान पद्धतीमुळे हा दंड थेट चालकांच्या मोबाईलवर पाठवला जात असून, महसूल गोळा करण्यासोबतच चालकांमध्ये शिस्त लावणे हा यामागील मुख्य उद्देश आहे.
कारवाईचा धडाका सुरू असला तरी गेल्या पाच महिन्यांपासून जिल्ह्यातील अपघातांचे सत्र थांबलेले नाही. ओव्हरस्पीडिंग आणि निष्काळजीपणामुळे अनेक निष्पाप नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. पाच महिन्यांत जिल्ह्यात १७३ अपघात झाले असून, यात ९५ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ९७ जण किरकोळ आणि २६ जण गंभीर जखमी झाले आहेत. वाहतूक पोलिसांकडे सध्या एक अत्याधुनिक इंटरसेप्टर वाहन असून, ते जिल्ह्यातील मुख्य रस्ते आणि महामार्गावर अचानक उभे राहून गस्त घालते. या वाहनातील स्पीड गन आणि लेझर कॅमेरे रात्रीच्या अंधारातही वाहनांची नंबर प्लेट स्पष्ट टिपू शकतात. चालकाने सीट बेल्ट किंवा हेल्मेट लावले नसेल, तरीही ही यंत्रणा त्याचे अचूक चित्रीकरण करते. जिल्ह्यातील विस्तीर्ण महामार्ग पाहता, वाहतूक पोलिसांकडे आणखी एक इंटरसेप्टर वाहन उपलब्ध करून देणे गरजेचे झाले असून, परिवहन कार्यालयाने शासनाकडे तसा प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे.
या पाच महिन्यांत वाहतूक पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या आकडेवारीनुसार, सिग्नल जंपिंग करणाऱ्या २४६५ वाहनांकडून १५,९३,५०० रुपये, मोबाईलवर बोलणाऱ्या ५१८ चालकांकडून १२,५४,००० रुपये, राँग साईडने वाहन चालवणाऱ्या ११,१३० चालकांकडून ९४,०९,००० रुपये आणि विना परवाना वाहन चालवणाऱ्या ६७८१ जणांकडून ४२,६५,५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करण्यात दुचाकीचालक आघाडीवर असून, जानेवारी ते मे या काळात तब्बल २१ हजार ७७४ दुचाकींवर कारवाई करण्यात आली आहे. विनाहेल्मेट आणि ट्रिपल सीट फिरणाऱ्या दुचाकीस्वारांना यामुळे चांगलाच चाप बसला आहे. वाढते रस्ते अपघात रोखण्यासाठी आणि शिस्त लावण्यासाठी इंटरसेप्टर वाहनाचा वापर केला जात असून, चालकांनी वेगावर नियंत्रण ठेवून वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे, अन्यथा कडक कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक नागेश भास्कर यांनी दिला आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *