National Sports day: नवेगावबांधच्या श्रेणीकचा सत्कार
कोच जागृत सेलोकर यांच्या मार्गदर्शनाखाली केलेली उज्ज्वल कामगिरी
नवेगावबांध : National Sports day राष्ट्रीय क्रीडा दिन २०२५ निमित्त गोंदिया जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा संकुल गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात जिल्ह्याचे नाव राज्य पातळीवर उज्ज्वल करणाऱ्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.या प्रसंगी नवेगावबांधच्या श्रेणीक विनोद डोंगरवार यांचा विशेष गौरव करण्यात आला. श्रेणीकने शालेय मैदानी राज्यस्तरीय स्पर्धा, पुणे (२०२४-२५) मध्ये ४x१०० मीटर रिले स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावून गोंदिया जिल्ह्याचा झेंडा उंचावला. यासोबत बादल कटरे, कलश चौधरी, सौरभ बोहरे आणि प्रतीक चित्रीव यांनीही नाशिक ॲथलेटिक्स फाउंडेशन आयोजित राज्यस्तरीय ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप (नाशिक २०२५) मध्ये सुवर्णपदकाची कमाई केली.National Sports day खेळाडूंच्या या कामगिरीचा गौरव मुख्य अतिथींच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला. या कार्यक्रमाला जिल्हा क्रीडा अधिकारी अनिराम मरसकोले, लायन्स क्लब भंडारा ब्रास सिटीचे अध्यक्ष डॉ. बबन मेश्राम, अश्वमेध स्पोर्ट्स फाउंडेशनच्या निर्देशिका व इंडियन ॲथलेटिक्स कोच कुमारी देवश्री मेश्राम आदी मान्यवर उपस्थित होते.श्रेणीक गेली दोन वर्षे गोंदिया जिल्ह्यातील इंडियन ॲथलेटिक्स कोच जागृत सेलोकर यांच्या मार्गदर्शनाखाली कठोर सराव करून राज्य स्तरावर चमकत आहे. त्यांच्या शिस्तबद्ध मार्गदर्शनामुळे श्रेणीकने आपल्या नवेगावबांध गावाचे नाव महाराष्ट्रभर पोहोचवले आहे. कार्यक्रमात सर्व मान्यवरांनी श्रेणीक, बादल, कलश, सौरभ, प्रतीक तसेच कोच जागृत सेलोकर यांचे कौतुक करून पुढील उज्ज्वल वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

