LatestNewsगोंदियाविदर्भ

Zp Gondia : जिल्हा परिषदेत ७३ शिक्षकांना उच्चश्रेणी मुख्याध्यापक पदावर पदोन्नती

गोंदिया : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात गेल्या काही काळात शिक्षकांच्या बदल्या व टंचाईमुळे शिक्षण व्यवस्थेवर मोठा ताण आला होता. मात्र, आता परिस्थिती सुधारण्याच्या दिशेने ठोस पावले उचलली जात आहेत. याच अनुषंगाने आज (ता. १९) जिल्हा परिषदेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत ७३ शिक्षकांना सेवाज्येष्ठतेच्या आधारावर उच्चश्रेणी मुख्याध्यापक पदावर पदोन्नती दिली. या निर्णयामुळे केवळ शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले नाही, तर शिक्षण व्यवस्थेच्या मजबुतीसाठीही नवा अध्याय सुरू झाला आहे.
शालेय शिक्षण विभागाच्या निर्देशानुसार व जिल्हा परिषदेच्या नियमानुसार आज दुपारी ४ वाजता जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यालयात पदोन्नती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जि. प. अध्यक्ष लायकराम भेंडारकर, उपाध्यक्ष सुरेश हर्षे तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरूगनाथम हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. पूर्णपणे पारदर्शक प्रक्रियेने ही पदोन्नती दिली गेली असून, यावेळी ७३ शिक्षकांना बढती पत्र प्रदान करण्यात आले.
अलीकडे शिक्षकांच्या बदल्या, निवृत्ती व रिक्त पदांमुळे जिल्ह्यातील शाळांमध्ये शिक्षण प्रक्रियेवर विपरीत परिणाम होत असल्याचे चित्र होते. ही बाब गांभीर्याने घेऊन जि.प. अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी स्वयंसेवक शिक्षकांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला. या स्वयंसेवकांना मानधन देण्यासाठी जिल्हा निधीतून आवश्यक तरतूदही करण्यात आली. या निर्णयामुळे सध्या अनेक शाळांमध्ये शिक्षकांची अनुपलब्धता भरून निघाली आहे. बढती मिळालेल्या शिक्षकांनी या निर्णयाचे स्वागत करत जिल्हा परिषद अध्यक्ष व जिल्हा परिषदेचे आभार मानले. “सेवाज्येष्ठतेनुसार बढती मिळाल्यामुळे आमचा आत्मविश्वास वाढला आहे. जिल्ह्यातील शिक्षण दर्जा उंचावण्यासाठी आता अधिक जबाबदारीने काम करू,” अशी प्रतिक्रिया काही नवपदोन्नत मुख्याध्यापकांनी दिली.
शिक्षण विभागात शिक्षकांची कमतरता दूर करण्याबरोबरच, प्रशासनिक कारभार अधिक परिणामकारक व सुयोग्य पद्धतीने चालावा यासाठी आवश्यक पावले उचलण्यात येणार आहेत. ७३ शिक्षकांची उच्चश्रेणी मुख्याध्यापक पदावर नियुक्ती ही केवळ एक पदोन्नती नव्हे, तर शिक्षण व्यवस्थेतील सकारात्मक बदलाची नांदी आहे. जिल्हा परिषदेचा हा निर्णय इतर जिल्ह्यांसाठीही मार्गदर्शक ठरेल, यात शंका नाही.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *