LatestNewsगोंदिया

Babasaheb Patil : शहरातील मुलभूत समस्यांचे निरसन करुन यंत्रणांनी समन्वयातून कामे करावी- पालकमंत्री बाबासाहेब पाटील

गोंदिया : गोंदिया शहरातील विकास कामांची धोरणे पूर्ण करण्यासाठी अपूर्ण असलेली नियोजित कामे वेळेत पूर्ण करुन नागरिकांच्या मुलभूत समस्यांचे निरसन करावे व विकास कामांना प्राधान्य देवून यंत्रणांनी आपसात समन्वय ठेवून कामे करावी, असे निर्देश राज्याचे सहकार मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री बाबासाहेब पाटील (Babasaheb Patil) यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज (ता.11) नगर परिषद व अल्पसंख्याक विभागा संबंधित आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते.

जिल्हाधिकारी प्रजित नायर, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम, अपर जिल्हाधिकारी मिनाझ मुल्ला, माजी आमदार राजेंद्र जैन यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.पालकमंत्री श्री. पाटील (Babasaheb Patil) म्हणाले, गोंदिया शहरातील भूमीगत ड्रेनेज कामामध्ये नागरिकांना होणाऱ्या अडचणी लक्षात घेता, सदर कामांना गती देवून  गुणवत्तापूर्ण कामे करण्यात यावे. पांगोली येथे डम्पिंग यार्ड तयार करण्यात येणार आहे. सदर गट हा 4.38 हेक्टरचा आहे. यासाठी घनकचऱ्याचे टेंडर देण्यात यावे. गोंदिया  नगर परिषद अंतर्गत 1072 गाळे आहेत. त्यापैकी काही गाळ्यांचे येत्या 15 दिवसात ई-ऑक्शन करण्यात यावे असे त्यांनी यावेळी सांगितले. गोंदिया नगर परिषदेत 272 कर्मचारी आहेत, त्यांच्याकडून रस्त्याची व नाल्यांच्या सफाईची कामे करण्यात येतात. गोंदिया शहराला जोडणाऱ्या एकमेव अंडरग्राऊंड मार्गामध्ये रस्ते, लाईट व पाणी निचऱ्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. नगर परिषद सुभाष गार्डनचे काम प्रगतीपथावर सुरु आहे. गोंदिया शहरातील वाढीव पाणी पुरवठ्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. रेलटोली येथील ऑडिटोरियमचे काम, नगर परिषद प्रशासकीय इमारत, रेलटोली पाल चौक ते कुडवा नाक्याकडे जाणाऱ्या मार्गावरील एनएमडी कॉलेज जवळील नगर परिषद पाईप लाईन फुटल्यामुळे झालेल्या हानीग्रस्त भागातील दुरुस्ती व सुरक्षाभिंत दुरुस्थिती स्थिती आदी कामांबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. बैठकीस जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल धोंगडे, नगर परिषद मुख्याधिकारी संदिप बोरकर, पोलीस निरीक्षक नंदिनी चानपूरकर यांचेसह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. पाटील (Babasaheb Patil) पुढे म्हणाले, गोंदिया जिल्ह्यातील मुस्लिम मुलींसाठी वसतिगृहाची सोय करण्यासाठी मुस्लिम बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करावा. भंडारा जिल्ह्याच्या धर्तीवर मौलाना अब्दुल कलाम आझाद अल्पसंख्याक महामंडळ गोंदिया येथे स्थापन करण्यासाठी शासनाकडके प्रस्ताव सादर करण्यात यावा. मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांना दहावीनंतर व्यावसायिक शिक्षणासाठी कोणत्या ट्रेडची आवश्यकता आहे, ते ठरवून शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था गोंदिया येथे प्रस्ताव सादर करण्यात यावा. ख्रिश्चन समाजासाठी दफन भूमीची जागा गोंदिया शहरात उपलब्ध नसल्यामुळे गोंदिया शहराच्या बाहेर जागेचा शोध घेण्यात यावा असे त्यांनी सांगितले.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *