ग्रामीण संस्कृती आणि लोककलांचा समृद्ध वारसा म्हणजे मंडई-मेळा उत्सव : आमदार विनोद अग्रवाल
गोंदिया परिसरातील गावागावांत मंडई मेळ्यांचा उत्साह; लावणी, दंडार आणि नाट्यप्रयोगांनी जिंकली रसिकांची मने!
गोंदिया : दिवाळी सणाचा आनंद ओसरताच गोंदिया विधानसभा क्षेत्रातील ग्रामीण भागात पारंपरिक सार्वजनिक मंडई-मेळा उत्सवांची मोठी धूम सुरू झाली आहे. गावागावांत मोठ्या उत्साहात साजरे होणारे हे मंडई मेळे केवळ मनोरंजनापुरते मर्यादित नसून, ग्रामीण समाजाची समृद्ध सांस्कृतिक परंपरा, लोककला, सामाजिक प्रबोधन आणि परस्पर बंधुभाव जपण्याचे जिवंत प्रतीक आहेत. आधुनिकतेच्या या युगातही ग्रामीण नागरिकांकडून हा अमूल्य वारसा तितक्याच श्रद्धेने आणि उत्साहाने पुढे नेला जात आहे, ही कौतुकास्पद बाब असल्याचे प्रतिपादन आमदार विनोद अग्रवाल यांनी केले. दासगाव बुजुर्ग, ढाकणी, नवरगाव खुर्द, गर्रा, कलारीटोला (बघोली) आणि दासगाव खुर्द येथे आयोजित मंडई मेळा, लावणी व नाट्य कार्यक्रमांच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमादरम्यान आमदार अग्रवाल यांनी सर्व ग्रामस्थांना दिवाळी व मंडई उत्सवाच्या शुभेच्छा देत, माता राणीच्या चरणी सर्वांच्या सुख-समृद्धी, उत्तम आरोग्य आणि भरभराटीसाठी प्रार्थना केली. ग्रामीण लोककलांचे महत्त्व विषद करताना ते म्हणाले की, भजन, कीर्तन, शायरी, दंडार, तमाशा, नाट्य आणि प्रवचन हे आपल्या प्राचीन संस्कृतीचे अविभाज्य अंग आहेत. ज्या काळात शिक्षण आणि संवादाची आधुनिक साधने नव्हती, त्या काळात आपल्या पूर्वजांनी याच लोककलांच्या माध्यमातून समाजप्रबोधन करून समाजाला नवी दिशा दिली. आजही गावागावांत ही परंपरा अखंड सुरू असणे, हे आपल्या सांस्कृतिक मुळांची मजबुती दर्शवते.
गावांशी जुळलेली नाळ आणि विकासकामांचा लेखाजोखा:
आपल्या आयुष्यातील मोठा काळ ग्रामीण भागात गेल्याने गावमातीशी विशेष जिव्हाळा असल्याचे सांगत आमदार अग्रवाल यांनी आपल्या कार्यकाळातील विविध विकासकामांचा आणि शासकीय योजनांचा आढावा ग्रामस्थांसमोर मांडला:
घरकुल योजना: गोंदिया तालुक्यात पूर्वी केवळ ५ हजार नागरिकांना घरकुल योजनेचा लाभ मिळाला होता; मात्र आता ही संख्या थेट ४४ हजारांपर्यंत पोहोचली असून, आणखी ४४ हजार नवीन घरकुलांना मंजुरी मिळाली आहे.
निराधार योजना: संजय गांधी निराधार आणि श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या ९ हजारांवरून वाढवून ३९ हजारांपर्यंत नेण्यात यश आले आहे.
जमीन पट्टे वाटप: विधानसभा क्षेत्रातील सुमारे १८ हजार नागरिकांना जमिनीचे मालकी हक्क (पट्टे) मिळवून देण्यात आले असून, उर्वरित ७ हजार लाभार्थ्यांना पट्टे देण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे.
मूलभूत सुविधा: गावांमधील अंतर्गत रस्ते, शेतकऱ्यांसाठी पांदण रस्ते, महिला बचत गटांसाठी सभागृहे, कृषी गोदामे, वाचनालये, बौद्ध विहार आणि मंदिरांच्या उभारणीसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. मंडई-मेल्यांसारखे पारंपरिक उत्सव आपली लोकसंस्कृती भावी पिढीपर्यंत पोहोचवण्याचे प्रभावी माध्यम ठरत असून, अशा कार्यक्रमांमुळे गावागावांतील सामाजिक एकता आणि सौहार्द अधिक घट्ट होते, असे सांगत ग्रामस्थांनी जपलेल्या या सांस्कृतिक परंपरेचे आमदार अग्रवाल यांनी मनःपूर्वक कौतुक केले.

