LatestNewsगोंदियामहाराष्ट्रविदर्भ

ग्रामीण महिलांच्या जीवनात परिवर्तन घडविणारे सशक्त माध्यम म्हणजे ‘उमेद’ : जि.प.अध्यक्ष लायकराम भेंडारकर

विभागीय सरस प्रदर्शनी व विक्री महोत्सव

गोंदिया : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्न्ती अभियान (उमेद) हे केवळ योजना नसून ग्रामीण महिलांच्या जीवनात परिवर्तन घडविणारे सशक्त माध्यम आहे, असे प्रतिपादन जि.प.चे अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी केले. प्रितम लॉन, गोंदिया येथे आयोजित विभागीय सरस प्रदर्शनी व विक्री महोत्सवाचे आज उद्घाटन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. जि.प.सदस्य जितेंद्र कटरे व उमेश्वरी बघेले, पं.स.सभापती मुनेश रहांगडाले, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रमिला जाखलेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) मधुकर वासनिक, जि.प.माजी सभापती पुजा सेठ यावेळी मंचावर उपस्थित होते.

श्री. भेंडारकर म्हणाले, गोंदिया जिल्ह्यात प्रथमच विभागीय सरस प्रदर्शनी व विक्री महोत्सव होत आहे. या माध्यमातून महिलांना प्रोत्साहन मिळेल. ‘उमेद’च्या माध्यमातून महिला सक्षम झाल्या पाहिजेत. ग्रामीण भागातील महिलांना स्वावलंबी व त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविणे आणि त्यांच्या उत्पादित वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करुन देणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. या प्रदर्शनीमध्ये ग्रामीण भागातील महिलांनी उत्पादित केलेले विविध उत्पादने आहेत. यामध्ये घरगुती खाद्यपदार्थ, कपडे, तसेच इतर स्थानिक उत्पादने ही त्यांच्या कष्टाची व कौशल्याची साक्ष देतात असे त्यांनी सांगितले. श्री. भेंडारकर पुढे म्हणाले, या प्रदर्शनाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांच्या उत्पादनांना केवळ बाजारपेठच मिळत नाही तर त्यांचा आत्मविश्वास आणि ओळख सुध्दा निर्माण होत आहे. गोंदिया जिल्ह्यातील स्वयंसहायता समुहांनी केलेली प्रगती ही खरोखरच या ठिकाणी उल्लेखनीय आहे. महिलांचे सक्षमीकरण हेच खऱ्या अर्थाने समाजाच्या सर्वांगिण विकासाचे मुळ तत्व आहे आणि हेच या अभियानाच्या माध्यमातून यशस्वीपणे पार पाडत आहे. या प्रदर्शनीमध्ये वेगवेगळ्या स्थानिक उत्पादनाची खरेदी करण्याची संधी मिळते. तसेच ‘व्होकल फॉर लोकल’ या संकल्पनेप्रमाणे बळकटी मिळते असे त्यांनी सांगितले.

आजपासून हे तीन दिवशीय विभागीय सरस प्रदर्शनी व विक्री महोत्सव सुरु झाले आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्न्ती अभियान (उमेद) हे महिला बचतगटांना कर्ज देत असते. तसेच त्यांना उद्योगासाठी प्रशिक्षण सुध्दा देण्यात येते. या माध्यमातून ग्रामीण महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. यामध्ये ग्रामीण समुहातील महिलांनी बनवलेल्या आकर्षक वस्तु, हस्तकला आणि घरउपयोगी वस्तु उपलब्ध आहेत. ग्रामीण महिलांनी तयार केलेले मसाले, लोणची, पापड आणि सेंद्रीय धान्य एकाच छताखाली उपलब्ध आहे. विदर्भातील अस्सल चवीच्या खाद्य पदार्थांचा आस्वाद घेण्याची संधी आहे. त्यामुळे या संधीचा नागरिकांनी अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम यांनी केले. यावेळी जि.प.सदस्य जितेंद्र कटरे व उमेश्वरी बघेले, पं.स. सभापती मुनेश रहांगडाले, जि.प.माजी सभापती पुजा सेठ यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्न्ती अभियान (उमेद) आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या विभागीय सरस प्रदर्शनी व विक्री महोत्सवाचे आयोजन दि.29 ते 31 मार्च 2026 या कालावधीत आयोजित हे प्रदर्शन केवळ एक ‘बाजार’ नसून ते आपल्या ग्रामीण महिलांच्या जिद्दीचे एक भव्य व्यासपीठ आहे. या महोत्सवात गोंदिया, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, नागपूर व वर्धा या नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यांतील महिला बचत गटांचे एकूण 75 स्टॉल्स लावण्यात आले आहेत. ग्रामीण कारागीर आणि महिला बचत गटांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ मिळवून देणे, हा या पलाश सरस प्रदर्शनीचा मुख्य उद्देश आहे. सदर प्रदर्शनी सकाळी 10 वाजेपासून ते रात्री 10 वाजेपर्यंत सर्वांसाठी खुली आहे. तरी नागपूर विभागातील नागरिकांनी या प्रदर्शनाला अवश्य भेट द्यावी व ग्रामीण महिलांचा उत्साह वाढवावा, असे आवाहन प्रकल्प संचालक प्रमिला जाखलेकर यांनी प्रास्ताविकातून केले. कार्यक्रमास नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विस्तार अधिकारी वैशाली खोब्रागडे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार जिल्हा अभियान व्यवस्थापक नरेंद्र रहांगडाले यांनी मानले.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *