कत्तलीसाठी नेल्या जाणाऱ्या ३० गोवंशीय जनावरांची सुटका
गोंदिया एलसीबीची सालेकसा येथे धडाकेबाज कारवाई!
ट्रक व दुचाकीसह १२ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त
सालेकसा : अवैधपणे आणि अत्यंत निर्दयतेने कत्तलीसाठी नेल्या जाणाऱ्या ३० गोवंशीय जनावरांचे प्राण वाचविण्यात गोंदियाच्या स्थानिक गुन्हे शाखेला (LCB) मोठे यश आले आहे. बुधवारी (दि. २५ नोव्हेंबर २०२६) सालेकसा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नवाटोला गावाबाहेर दरेकसा-सालेकसा मार्गावर सापळा रचून ही धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी गोवंशीय जनावरे, टाटा आयशर ट्रक आणि एक दुचाकी असा एकूण १२ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, पाच आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून दोघांना बेड्या ठोकल्या आहेत.
गोपनीय माहितीवरून नवाटोला शिवारात नाकाबंदी:
जिल्हा पोलीस अधीक्षक गोरख भामरे व अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या आदेशानुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात गस्त घालत होते. दरम्यान, दरेकसा-सालेकसा मार्गावरून एका चारचाकी मालवाहू वाहनातून गोवंशीय जनावरांची कत्तलीसाठी अवैध वाहतूक होत असल्याची खात्रीशीर माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी नवाटोला गावाबाहेर सापळा रचून नाकाबंदी केली.
पोलिसांना पाहताच पायलटिंग करणाऱ्या दुचाकीस्वाराचे पलायन:
दरेकसाकडून सालेकसाच्या दिशेने येणारा एक टाटा आयशर ट्रक आणि त्याच्या मागे पाळत ठेवत चालणारी एक दुचाकी पोलिसांना दिसली. पोलिसांची चाहूल लागताच दुचाकीस्वाराने आपले वाहन जागेवरच सोडून घनदाट जंगलाच्या दिशेने धूम ठोकली. पोलिसांनी तात्काळ आयशर ट्रक थांबवून त्याची झडती घेतली असता, ट्रकमध्ये चारा-पाण्याची कोणतीही व्यवस्था न करता ३० गोवंशीय जनावरे अत्यंत अमानुष आणि दाटीवाटीने बांधून ठेवल्याचे आढळून आले.
जप्त मुद्देमाल व आरोपींचा तपशील:
कारवाईदरम्यान पोलिसांनी २ लाख १० हजार रुपये किमतीची ३० गोवंशीय जनावरे, १० लाख रुपये किमतीचा टाटा आयशर ट्रक आणि ७० हजार रुपये किमतीची दुचाकी असा एकूण १२ लाख ८० हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. याप्रकरणी घटनास्थळावरून ट्रकचालक महबूब आशिक खान (वय ३९, रा. पार्वतीनगर, नागपूर) आणि शारीख कुतरताल खान (वय ३५, रा. मूर्तिजापूर, जि. अकोला) यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे.
यासोबतच ट्रक मालक रऊफ खान (रा. अमरावती), जनावरांचा पुरवठा करणारा विजय ऊर्फ छोटू हटले (रा. पानगाव, ता. सालेकसा) आणि फरार झालेला अज्ञात दुचाकीस्वार अशा एकूण पाच जणांविरुद्ध सालेकसा पोलीस ठाण्यात प्राणी क्रूरता प्रतिबंधक अधिनियम, महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम आणि भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सदर यशस्वी कारवाई पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार दीक्षितकुमार दमाहे, सुबोधकुमार बिसेन, सोमेंद्रसिंग तुरकर, भोजराज बहेकार, पोलीस शिपाई छगन विठ्ठले व निलेश ठाकरे यांच्या पथकाने पार पाडली. फरार आरोपींचा शोध आणि पुढील तपास सालेकसा पोलीस करत आहेत.

