LatestNewsगोंदियाविदर्भ

फेसबुक रील्सद्वारे नफ्याचे आमिष दाखवून ११.९६ लाखांची फसवणूक; आमगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल!

‘इझीइन्व्हेस्ट’ (Ezinvest) कंपनीत गुंतवणुकीच्या नावाखाली गंडा
आमगाव (गोंदिया) :
सोशल मीडियावरील फेसबुक रील्स व्हिडिओद्वारे शेअर ट्रेडिंग व गुंतवणुकीवर दररोज भरघोस परतावा मिळण्याचे आमिष दाखवून आमगाव तालुक्यातील एका नागरिकाची तब्बल ११ लाख ९६ हजार २९४ रुपयांची ऑनलाइन आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी शनिवारी (दि. २१ नोव्हेंबर) आमगाव पोलीस ठाण्यात अज्ञात सायबर ठगांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१८(४) सहकलम ६६(डी) माहिती तंत्रज्ञान अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी ओमेंद्र प्रेमलाल आगासे (वय ४७, रा. बोथली, ता. आमगाव) यांनी फेसबुकवरील एका रील्स व्हिडिओवर ‘Ezinvest’ कंपनीमध्ये गुंतवणूक केल्यास दररोज जादा नफा मिळत असल्याची जाहिरात पाहिली होती. त्यानंतर अज्ञात सायबर आरोपींनी फोन आणि व्हॉट्सॲपद्वारे आगासे यांच्याशी संपर्क साधला.
सुरुवातीला नफ्याची रक्कम पाठवून जिंकला विश्वास
तक्रारदाराचा विश्वास संपादन करण्यासाठी सायबर ठगांनी सुरुवातीला गुंतवणुकीवर काही नफ्याची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली. परतावा मिळत असल्याची खात्री पटल्यानंतर आरोपींनी अधिक नफ्याचे आमिष दाखवून आगासे यांना विविध बँक खात्यांमध्ये एनईएफटी (NEFT) आणि आरटीजीएस (RTGS) द्वारे एकूण १२ लाख रुपये गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले. हा सर्व प्रकार ९ सप्टेंबर २०२६ ते १० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत घडला.
पैसे परत मागताच आणखी साडेपाच लाखांची मागणी
गुंतवणुकीची रक्कम वाढल्यानंतर ओमेंद्र आगासे यांनी आपले पैसे परत मागितले. तेव्हा आरोपींनी “ट्रेडिंगमध्ये नुकसान झाले आहे,” असे कारण सांगत उलट आणखी ५ लाख ५० हजार रुपयांची मागणी केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच आगासे यांनी तात्काळ सायबर पोर्टलवर तक्रार नोंदवून आमगाव पोलीस ठाणे गाठले.
सुरुवातीला मिळालेला परतावा वजा जाता आगासे यांची एकूण ११ लाख ९६ हजार २९४ रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आमगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निळकंठ कुकडे या गुन्ह्याचा पुढील तांत्रिक तपास करत आहेत.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *