मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मदाय रुग्णालय कक्षाअंतर्गत बैठक
गोंदिया : मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मदाय रुग्णालय कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, गोंदियाची बैठक येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सभागृहात २६ सप्टेंबर रोजी घेण्यात आली. ही बैठक मंत्रालयीन कक्षप्रमुख मुंबई रामेश्वर नाईक यांच्या मार्गदर्शनात आणि जिल्हा समन्वयक डॉ. तुषार पाटील यांच्या नेतृत्वात घेण्यात आली.बैठकीच्या अध्यक्षस्थानी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे होते. त्यांनी मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाबद्दल माहिती दिली. जिल्ह्यातील गोरगरीब रुग्णांना लाभ मिळाला पाहिजे, असे ते म्हणाले. कार्यक्रमाला मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे स्थानिक सामाजिक प्रतिनिधी दलजितसिंग खालसा, विजय अग्रवाल, डॉ. हनुमंतप्रसाद ओझा, डॉ. रमेश सोनी, उप वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनीष पदरे यांच्यासह मुख्यमंत्री सहायता निधीअतंर्गत येणारे खासगी रुग्णालयांचे डॉक्टर व त्यांचे मुख्य प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.बैठकीत मुंबई मंत्रालय कक्षाचे तज्ञ डॉ. पंकज लोनगाडागे यांनी उपस्थितांना मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाच्या कार्यप्रणालीसंदर्भात पॉवर प्रेजेन्टेशनद्वारे माहिती दिली. कक्षप्रमुख डॉ. मुकेश येरपुडे यांनी कक्षात होणाऱ्या कार्याची माहिती दिली. याचवेळी सीएसआरसंदर्भात चर्चा करण्यात आली. संचालन कक्षाचे वैद्यकीय समाजसेवा अधीक्षक मारोती कुचनकर यांनी केले. यशस्वितेसाठी अंकित बंधनवार, अभिषेक भलावी, श्रीकांत सोनवाने यांनी सहकार्य केले.

