LatestNewsगोंदिया- भंडाराविदर्भ

गोंदियात पोलीस स्मृतीदिनी १५४ वीर शहीदांना सलामी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांकडून नमन

गोंदिया : आपल्या मातृभूमीचे संरक्षण आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कर्तव्यपथावर सर्वोच्च बलिदान देणाऱ्या अमर हुतात्म्यांच्या स्मृतींना गोंदियात अत्यंत भावपूर्ण व शिस्तबद्ध वातावरणात वंदन करण्यात आले. २१ ऑक्टोबर या ‘पोलीस स्मृती दिना’च्या निमित्ताने गोंदियातील कारंजा येथील पोलीस मुख्यालय कवायत मैदानावर कर्तव्य बजावताना वीरमरण पत्करलेल्या देशभरातील १५४ पोलीस अधिकारी व जवानांना हवेत गोळ्या झाडून शोक सलामी देत मानवंदना अर्पण करण्यात आली. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी मंदार पत्की आणि जिल्हा पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांनी पोलीस हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून वीरांच्या त्यागाला नमन केले.
याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना जिल्हाधिकारी मंदार पत्की यांनी शहीद पोलिसांच्या शौर्याला सलाम केला. देशवासीयांचा ‘उद्या’ सुरक्षित राहावा यासाठी आपल्या ‘आज’चा आणि स्वतःच्या जिवाचा त्याग करणाऱ्या खाकी वर्दीतील रक्षकांचे हे ऋण राष्ट्र कधीही विसरू शकत नाही, अशा शब्दांत त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. लोकशाहीचे रक्षण आणि देशांतर्गत शांतता टिकवून ठेवण्यासाठी पोलीस दलाचे योगदान अतुलनीय असल्याचे त्यांनी नमूद केले.
१ सप्टेंबर २०२५ ते ३१ ऑगस्ट २०२६ या वर्षभराच्या कालावधीत संपूर्ण भारतामध्ये कायदा व सुव्यवस्था राखताना शहीद झालेल्या एकूण १५४ पोलीस अधिकारी व जवानांच्या नावांचे स्मरण सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे व पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत हत्तीमारे यांनी अभिमानाने व भावपूर्ण आवाजात केले. त्यानंतर गोंदिया जिल्हा पोलीस दलाचे प्लाटून कमांडर रापोउपनि दीपक शेंडे आणि आय.आर.बी. ग्रुप क्र. १५ गोंदियाचे (बिरसी कॅम्प) प्लाटून कमांडर पोउपनि कृष्णा कुरसुंगे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने शिस्तबद्ध शोक सलामी दिली. या वेळी पोलीस जवानांनी प्रत्येकी तीन राऊंड हवेत फायर करून वीर हुतात्म्यांना अंतिम सलामी दिली.
कार्यक्रमादरम्यान प्रमुख अतिथी जिल्हाधिकारी मंदार पत्की आणि पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांनी शहीद जवानांच्या कुटुंबीयांची आत्मीयतेने भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्या वतीने देण्यात आलेले कृतज्ञतापूर्वक स्मरणपत्र व भेटवस्तू शहीद कुटुंबीयांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आल्या. या सोहळ्यास पोलीस उपअधीक्षक (मुख्यालय) सुनील बलभीम दरेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेशचंद्र शुक्ला, परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक दीपम दहिवले यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी, अंमलदार आणि शहीद कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मपोहवा मंगला प्रधान यांनी केले. हा प्रेरणादायी सोहळा यशस्वी करण्यासाठी रापोनि राजेश सरोदे, रापोउपनि दीपक शेंडे, सफौ मुस्तफा सरवर, पंकज पांडे, चंद्रकांत बरकुंड, पोहवा संतोष चौधरी, राज वैद्य, राकेश उके, गडपायले, पोका अतुल कोल्हाटकर, मपोका पल्लवी गजभिये तसेच सपोफौ देविदास तायवाडे यांच्या वाद्यवृंद पथकाने परिश्रम घेतले. कर्तव्य बजावताना हौतात्म्य पत्करणाऱ्या वीरांचा हा त्याग संपूर्ण पोलीस दलाला व समाजाला निरंतर प्रेरणा देत राहील.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *