‘SIR’ च्या नावाखाली मतचोरीचा डाव; गोंदियात ‘इंडिया आघाडी’ आक्रमक, राष्ट्रपतींकडे गंभीर तक्रार!
मुख्य निवडणूक आयुक्तांना बडतर्फ करून देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा
गोंदिया : देशातील लोकशाही धोक्यात आणून ‘विशेष सखोल पुनरावृत्ती’ (SIR) प्रक्रियेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर वैध मतदारांची नावे यादीतून वगळून ‘मत चोरी’ केली जात असल्याचा खळबळजनक आरोप ‘इंडिया आघाडी, गोंदिया जिल्हा’च्या वतीने करण्यात आला आहे. याप्रकरणी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना तातडीने सेवेतून बडतर्फ करून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करत त्यांना अटक करावी, अशी थेट मागणी गुरुवारी गोंदियाच्या उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली.
निवेदनात नमूद केल्यानुसार, गेल्या काही वर्षांपासून स्वायत्त असलेली निवडणूक संस्था पूर्णपणे सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या (BJP) तालावर काम करत असून ती एक बाहुले बनली आहे. निवेदनात प्रसिद्ध वृत्ताचा हवाला देत सांगण्यात आले की, सहकारी निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांच्या एकतर्फी व हुकूमशाही कारभारावर गंभीर आक्षेप नोंदवले आहेत.
मागील ८ महिन्यांत तब्बल १४ वेळा त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निर्णयांवर थेट असंतोष व्यक्त केला आहे. नवीन मतदारांची अनधिकृत नोंदणी, अचानक नावे वगळणे आणि निवडणूक आयोगाच्या आयटी (IT) प्रणालीचे केंद्रीकरण करताना इतर आयुक्तांना अंधारात ठेवण्यात आल्याचे उघड झाले आहे.
नेत्यांचा संताप; निवेदनावर प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या
सत्ताधारी भाजपला निवडणूक प्रक्रियेत अनुचित लाभ मिळवून देण्यासाठी संपूर्ण शासकीय व निवडणूक यंत्रणेचा दुरुपयोग केला जात असून ‘एसआयआर’च्या नावाखाली मतदारांचे हक्क हिरावून घेणे ही लोकशाहीची थेट हत्या आहे, असा तीव्र संताप ‘इंडिया’ आणि ‘महाविकास आघाडी’च्या नेत्यांनी व्यक्त केला. या निवेदनावर काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष अमर वराडे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे जिल्हाध्यक्ष रविकांत बोपचे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाध्यक्ष पंकज यादव, भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे (CPI) जिल्हाध्यक्ष हाऊसलाल रहांगडाले, पी. जी. कटरे, जितेंद्र कतरे, मिलिंद गणवीर, मधुसूदन दोनोडे यांच्यासह महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

