गडचिरोली जिल्ह्यात हिवताप रुग्णसंख्येत ४१.६ टक्के मोठी घट; ‘मलेरियामुक्त अभियाना’ला यश
जानेवारी ते ऑगस्टदरम्यान अवघे ३,४७५ रुग्ण : १,१९५ गावांत कीटकनाशक फवारणी; १.१६ लाख औषधयुक्त मच्छरदाण्यांचे वाटप
गडचिरोली : जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळे गडचिरोली जिल्ह्यात हिवतापाच्या (मलेरिया) रुग्णसंख्येत लक्षणीय घट झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा रुग्णसंख्येत तब्बल ४१.६ टक्क्यांची घसरण नोंदविण्यात आली आहे. अतिदुर्गम, नक्षलग्रस्त व डोंगराळ भागातील वाड्या-वस्त्यांवर आरोग्य यंत्रणेने थेट पोहोचून दिलेल्या दर्जेदार सेवेमुळे ‘मलेरियामुक्त गडचिरोली’ या संकल्पनेला मोठे बळ मिळाले आहे.
मिळालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, जानेवारी ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत जिल्ह्यात ५,९४९ हिवताप रुग्णांची नोंद झाली होती. मात्र, प्रशासनाच्या नियोजनबद्ध मोहिमेमुळे जानेवारी ते ऑगस्ट २०२६ या आठ महिन्यांत हा आकडा ३,४७५ वर खाली आला आहे. मलेरिया टास्क फोर्स समितीचे अध्यक्ष डॉ. अभय बंग, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाचे पथक ही व्यापक मोहीम यशस्वीपणे राबवत आहे.
घरोघरी जाऊन रॅपिड टेस्ट; भामरागडमध्ये १०० टक्के फवारणी
जिल्ह्यातील आशा स्वयंसेविका आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांतील कर्मचारी घरोघरी जाऊन नागरिकांचे सर्वेक्षण करत आहेत. ताप आलेल्या संशयित रुग्णांची ‘रॅपिड डायग्नोस्टिक टेस्ट किट’द्वारे (RDT) जागेवरच मोफत रक्ततपासणी केली जात आहे. डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २५ विशेष पथकांमार्फत १,१९५ गावांमध्ये कीटकनाशकांची धूर व औषध फवारणी सुरू असून, भामरागड तालुक्यात १०० टक्के फवारणी पूर्ण झाली आहे. याशिवाय, अतिसंवेदनशील भागातील नागरिकांना डासांपासून संरक्षणासाठी तब्बल १ लाख १६ हजार ३७२ विशेष औषधबाधित मच्छरदाण्यांचे मोफत वाटप करण्यात आले आहे.
पुजारी-वैदूंचा सहभाग; रुग्णांना बुडीत मजुरीचा दिलासा
दुर्गम भागातील आदिवासी बांधव आजारी पडल्यास तांत्रिक व पारंपरिक उपचारांवर भर देतात. त्यामुळे नागरिकांना शासकीय आरोग्य केंद्रांत आणण्यासाठी स्थानिक पुजारी व वैदूंची मदत घेऊन जनजागृती करण्यात येत आहे. इतकेच नव्हे तर, आजारपणामुळे रोजंदारी बुडू नये आणि रुग्णाने उपचाराचा संपूर्ण कोर्स पूर्ण करावा यासाठी शासनाकडून ५६६ रुग्णांच्या बँक खात्यात प्रत्येकी ५०० रुपये याप्रमाणे २ लाख ८३ हजार रुपयांची बुडीत मजुरी थेट जमा करण्यात आली आहे.
नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन
हिवतापाचा धोका कायमचा नष्ट करण्यासाठी नागरिकांनी ताप येताच नजीकच्या आरोग्य केंद्रात किंवा आशा स्वयंसेविकेकडे जाऊन मोफत तपासणी करावी, घराभोवती डबकी व पाणी साचू देऊ नये, आठवड्यातून एक दिवस ‘कोरडा दिवस’ पाळावा आणि नियमितपणे मच्छरदाणीचा वापर करावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. आरोग्याशी संबंधित कोणत्याही मदतीसाठी व मार्गदर्शनासाठी २४ तास सुरू असणाऱ्या ‘१०४’ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

