सेलिब्रिटींनो सावधान! दिशाभूल करणाऱ्या जाहिराती केल्यास थेट कारवाई;
FDA आयुक्त तुकाराम मुंढे आक्रमक!हानिकारक वस्तूंचा प्रचार खपवून घेणार नाही – तुकाराम मुंढे
पुणे : दिशाभूल करणाऱ्या किंवा नियमबाह्य अन्नपदार्थांच्या जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटींवरही कायद्यानुसार कारवाई होऊ शकते, असा इशारा अन्न व औषध प्रशासनाचे (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे. जाहिरातीतील उत्पादनाची सत्यता, त्याचा संदर्भ आणि त्यातून ग्राहकांवर होणारा परिणाम तपासण्याची जबाबदारी जाहिरातदारासह उत्पादनाचे समर्थन करणाऱ्या व्यक्तीचीही असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुंढे यांच्या भूमिकेची चर्चा सध्या अभिनेता शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना बजावलेल्या कारणे दाखवा नोटीसींमुळे सुरू झाली आहे. एफडीएने ११ ऑगस्टला या तिघांना ‘विमल इलायची’च्या जाहिरातीप्रकरणी नोटीसा बजावल्या. ही जाहिरात महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या ‘विमल पानमसाल्या’ची अप्रत्यक्ष किंवा ‘सरोगेट’ जाहिरात ठरते का, याबाबत प्रशासनाने स्पष्टीकरण मागितले आहे. दरम्यान, नोटीसांना उत्तर देण्यासाठी संबंधित कलाकारांना १५ दिवसांची मुदत देण्यात आली होती. मुंढे यांनी दिलेल्या माहितीनुसार, तिघांपैकी दोघांनी आपली बाजू मांडली असून एका कलाकाराकडून मुदतीत उत्तर मिळालेले नाही. त्या प्रकरणात पुढील सुनावणी व कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. एफडीएच्या मते, अन्नपदार्थांच्या जाहिरातींमध्ये ग्राहकांची दिशाभूल होणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे. ‘अन्नसुरक्षा आणि मानके (जाहिरात व दावे) नियम, २०१८’ नुसार जाहिरातदाराबरोबरच उत्पादनाचा प्रचार करणाऱ्या व्यक्तीचीही जबाबदारी निश्चित होऊ शकते. त्यामुळे केवळ जाहिरातीसाठी मानधन घेणाऱ्या व्यक्तीला नियमांपासून सूट मिळत नाही, अशी प्रशासनाची भूमिका आहे. तथापि, संबंधित जाहिरात कंपनी किंवा कलाकारांकडून मांडण्यात आलेली कायदेशीर बाजूही प्रक्रियेत विचारात घेतली जात आहे. दोन कलाकारांनी निर्मात्याची जबाबदारी असल्याचे सांगितल्याचे मुंढे यांनी नमूद केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, या दाव्याची सुनावणी प्रक्रियेत तपासणी केली जाईल. या पार्श्वभूमीवर, सार्वजनिक प्रभाव असलेल्या व्यक्तींनी उत्पादनाचे समर्थन करण्यापूर्वी संबंधित नियमांची पडताळणी करावी, असा संदेश एफडीएकडून देण्यात आला आहे. दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर कारवाई करण्याची प्रक्रिया पुढेही सुरू राहणार असल्याचे मुंढे यांनी स्पष्ट केले आहे.

