अस्थी विसर्जनासाठी गेलेल्या १७ वर्षीय विद्यार्थ्याचा डोहात बुडून दुर्दैवी मृत्यू!
गडकुंभलीच्या डोहात आंघोळ करताना घडली दुर्घटना
पिंपळगाव-खांबी परिसरात शोककळा
बोंडगाव देवी (अर्जुनी मोरगाव) : अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील पिंपळगाव-खांबी येथील रहिवासी व १२ वीचा विद्यार्थी मयूर युवराज ब्राम्हणकर (वय १७) याचा साकोली तालुक्यातील गडकुंभली येथील डोहात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (१७ सप्टेंबर) घडली. या दुर्दैवी घटनेने पिंपळगाव-खांबीसह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.प्राप्त माहितीनुसार, पिंपळगाव-खांबी येथील एका नागरिकाच्या अस्थी विसर्जनाच्या कार्यक्रमासाठी मयूर ब्राम्हणकर हा आपल्या कुटुंबीयांसह व गावकऱ्यांसोबत गडकुंभली येथील डोहावर गेला होता. गडकुंभली डोहावर अस्थी विसर्जनाचा कार्यक्रम सुरू असताना मयूर आंघोळ करण्यासाठी पाण्यात उतरला होता. मात्र, डोहातील पाण्याच्या खोलीचा अचूक अंदाज न आल्यामुळे तो अचानक खोल पाण्यात बुडू लागला.मयूर पाण्यात बुडत असल्याचे लक्षात येताच सोबत असलेल्या नागरिकांनी त्याला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. घटनेची माहिती तातडीने प्रशासकीय यंत्रणेला देण्यात आल्यानंतर शोधमोहीम राबवून मयूरचा मृतदेह डोहातून बाहेर काढण्यात आला.कुटुंबावर दुःखाचा डोंगर; परिसरात हळहळ१२ वीत शिक्षण घेत असलेल्या मयूरच्या अशा अकस्मात आणि अकाली जाण्याने ब्राम्हणकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मयूरच्या निधनाची बातमी समजताच त्याचे मित्र, शिक्षक, नातेवाईक आणि गावकऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. या घटनेची नोंद साकोली पोलिसांनी घेतली असून, पोलीस या प्रकरणी पुढील कायदेशीर तपास करत आहेत.

