LatestNewsगोंदिया- भंडाराविदर्भ

गोंदियातील जुन्या रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाला गती द्या; खासदार राजेंद्र जैन यांचे प्रशासनाला निर्देश!

उत्तर-दक्षिण भागाला जोडणाऱ्या पुलाच्या बांधकामाची केली पाहणी

गोंदिया (नवचैतन्य ): गोंदिया शहराच्या उत्तर आणि दक्षिण भागाला जोडणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या जुन्या निर्माणाधीन रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाची खासदार राजेंद्र जैन यांनी आज प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली. या उड्डाणपुलाच्या बांधकामाच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेत त्यांनी रखडलेले काम युद्धपातळीवर पूर्ण करून हा पूल लवकरात लवकर नागरिकांच्या वाहतुकीसाठी खुला करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

गोंदिया शहराच्या दोन प्रमुख भागांना जोडणारा हा उड्डाणपूल वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जातो. या पुलाचे बांधकाम सुरू असल्याने नागरिकांना आणि वाहनधारकांना दररोज मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी व फेऱ्याचा सामना करावा लागत आहे. नागरिकांची ही गैरसोय लक्षात घेऊन खासदार राजेंद्र जैन यांनी पुलाच्या बांधकाम स्थळाला भेट दिली.यावेळी त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे (PWD) कार्यकारी अभियंता श्री. रामटेके आणि इतर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. बांधकामाचा दर्जा उत्तम राखत शिल्लक राहिलेली कामे वेळेत पूर्ण करावीत, तसेच शहरवासीयांची वाहतूक कोंडीतून लवकरात लवकर मुक्तता करण्यासाठी हा उड्डाणपूल तात्काळ वाहतुकीस सज्ज करावा, अशी ताकीद खासदार जैन यांनी यावेळी दिली.

नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार

हराच्या मध्यवर्ती भागात असलेला हा उड्डाणपूल अनेक दिवसांपासून निर्माणाधीन असल्याने परिसरातील व्यापारी आणि सर्वसामान्य वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. खासदारांच्या या प्रत्यक्ष पाहणी दौऱ्यानंतर आणि दिलेल्या कडक निर्देशांनंतर आता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कामाला वेग मिळून हा मार्ग लवकरच खुला होईल, अशी आशा नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *