LatestNewsगोंदिया- भंडाराविदर्भ

गोंदिया-चांदाफोर्ट मार्गावर रेल्वेच्या धडकेत बिबट्याचा करुण अंत!

अर्जुनी ते बडेगाव जवळील दुर्घटना; धड अन् मुंडके झाले वेगळे

नवेगावबांध (गोंदिया ) : गोंदिया–चांदाफोर्ट रेल्वे मार्गावर अर्जुनी रेल्वे स्थानक ते बडेगाव रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वेची जोरदार धडक बसून एका बिबट्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवार, ६ सप्टेंबर रोजी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली.मिळालेल्या माहितीनुसार, अर्जुनी ते बडेगाव दरम्यान पोल क्रमांक ४०८/४५ जवळ रेल्वे मार्गावर बिबट्या मृतावस्थेत आढळून आल्याची माहिती रेल्वे विभागाकडून वनविभागाला देण्यात आली होती. माहिती मिळताच अर्जुनी-मोर येथील वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी पाहणी केली असता, रेल्वेची धडक अत्यंत भीषण असल्याचे स्पष्ट झाले. धडकेच्या तीव्रतेमुळे मृत वन्यप्राण्याचे मुंडके आणि धड वेगळे झाले होते. वनपरिक्षेत्र अधिकारी आर. एम. बहुरे यांच्या समक्ष घटनास्थळी तातडीने मौका पंचनामा करण्यात आला.’SOP’ नुसार शवविच्छेदन व पुढील कारवाईघटनेचा गांभीर्य लक्षात घेऊन मृत वन्यप्राण्याचे शवविच्छेदन शासनाच्या नियमानुसार (SOP) पार पडले. यावेळी गोंदियाचे उपवनसंरक्षक, अविनाश मेश्राम (प्रकाष्ट निष्काशन वनाधिकारी, नवेगावबांध), अनिरुद्ध कांबळे (तहसीलदार, अर्जुनी-मोर), तसेच वन्यजीव संरक्षण विभाग, पशुविकास अधिकारी (वडेगाव) आणि पशुधन विकास अधिकारी (बडेगाव) यांच्यासह संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.शवविच्छेदनादरम्यान वन्यप्राण्याचे विविध नमुने (Samples) घेण्यात आले असून ते पुढील वैद्यकीय अहवालासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार असल्याचे वनविभागाच्या प्रेसनोटमध्ये नमूद करण्यात आले आहे. उपवनसंरक्षक गोंदिया यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभाग अर्जुनी-मोर या प्रकरणी पुढील कायदेशीर कार्यवाही करत आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *