LatestNewsगोंदिया- भंडाराविदर्भ

सितासावंगी जंगलातील वन्यप्राणी शिकारीचा डाव उधळला! वनविभागाची धडक कारवाई; सहा आरोपी जेरबंद

तीन आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; फरार आरोपींना लेंडेझरी जंगलातून पकडले
तुमसर/नाकाडोंगरी (भंडारा):
नाकाडोंगरी वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या गर्रा-बघेडा सहवनक्षेत्र कवलेवाडा व सितासावंगी येथील कक्ष क्रमांक ६५ मधील राखीव जंगलात वन्यप्राण्यांची शिकार करण्याच्या उद्देशाने शिरलेल्या सहा संशयित आरोपींचा डाव वनविभागाने उधळून लावला आहे. या प्रकरणात आतापर्यंत सर्वच्या सर्व सहाही आरोपींना वनविभागाने ताब्यात घेतले असून पुढील चौकशी व तपास सुरू आहे.
२९ ऑगस्टच्या रात्री घडला प्रकार:
वनविभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, २९ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास सितासावंगी येथील काही इसम वन्यप्राण्यांची शिकार करण्यासाठी जंगलात गेल्याची माहिती नाकाडोंगरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन रामटेके यांना मिळाली. माहिती मिळताच वनाधिकारी व वनकर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन शोधमोहीम सुरू केली. यावेळी राजेश हेमराज लाळे (रा. लोभी) याला पकडण्यात वनविभागाला यश आले; मात्र इतर आरोपी अंधाराचा फायदा घेऊन जंगलात पसार झाले होते.
दोघांना १५ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी:
या घटनेनंतर ३० ऑगस्ट रोजी फरार आरोपींचा शोध घेताना आकाश मेहतर लाळे व पतीराम उदाराम मेश्राम (दोघेही रा. सितासावंगी) यांना वनविभागाने ताब्यात घेतले. दोन्ही आरोपींना तुमसर येथील न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना १५ सप्टेंबर २०२६ पर्यंत भंडारा येथे न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
फरार तीन आरोपी लेंडेझरी जंगलातून जेरबंद:
दरम्यान, २ सप्टेंबर रोजी या प्रकरणातील आणखी तीन फरार आरोपी लेंडेझरी गावालगतच्या जंगलात लपून बसल्याची गुप्त माहिती वनविभागाला मिळाली. वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करून धाड टाकण्यात आली आणि आरोपी क्रमांक २, ५ व ६ यांना ताब्यात घेण्यात आले. पुढील चौकशीसाठी त्यांना नाकाडोंगरी वनपरिक्षेत्र कार्यालयात आणण्यात आले आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात कारवाई:
ही यशस्वी कारवाई उपवनसंरक्षक योगेन्द्र सिंह (भंडारा) तसेच निष्कासन अधिकारी रितेश भोंगाडे (गडेगाव आगार) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन रामटेके, क्षेत्रसहाय्यक संजय शेंडे, टी. एच. घुले, बिट रक्षक व्ही. के. नेवारे, पी. एस. पंचबुद्धे, डी. जे. उईके, ओ. एन. मारे, एम. के. सूर्यवंशी तसेच नाकाडोंगरी उडते पथक सहभागी झाले होते. आरोपींकडून शिकारीसाठी वापरण्यात आलेली साधने किंवा इतर साहित्याबाबत वनविभाग अधिक चौकशी करत आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *