LatestNewsगोंदिया- भंडाराविदर्भ

दारू माफियांचे धाबे दणाणले! वर्षभरात १,८५० गुन्हे दाखल, २ हजार आरोपी जेरबंद

हातभट्ट्यांवर युरिया अन् रासायनिक विष कालवणाऱ्यांवर प्रशासनाचा मोठा हातोडा!
गोंदिया :
पुण्यात विषारी दारूमुळे १६ निष्पाप नागरिकांचा बळी गेल्यानंतर राज्यभरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. या घटनेची गंभीर दखल घेत गोंदिया जिल्हा राज्य उत्पादन शुल्क विभाग आता पूर्णपणे ॲक्शन मोडमध्ये आला आहे. जिल्ह्यात अवैध हातभट्टी, दारू विक्री आणि विषारी रसायने वापरणाऱ्या माफियांविरोधात प्रशासनाने थेट मोहीम उघडली असून धडक कारवाईचे सत्र सुरू केले आहे. उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार, वर्ष २०२५-२६ या कालावधीत जिल्ह्यात एकूण १,८५० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये १,६२४ वारस गुन्हे, तर २२६ बेवारस गुन्हे समाविष्ट आहेत. धक्कादायक बाब म्हणजे या वर्षभरात तब्बल २ हजार आरोपींच्या मुसक्या आवळण्यात प्रशासनाला यश आले आहे.
या कारवाईच्या सविस्तर आकडेवारीनुसार, एकट्या एप्रिल २०२६ मध्ये १६६ गुन्ह्यांमध्ये १५५ आरोपींना अटक करून ५५ लाख ५६ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला. तर मे २०२६ मध्ये १७८ गुन्ह्यांमध्ये १५८ आरोपींना अटक करत ७५ लाख ४५ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला. चालू जून २०२६ मधील विशेष मोहिमेत ७२ अवैध अड्ड्यांवर छापे टाकून ५२ आरोपींना अटक करण्यात आली असून ३५ लाख ११ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अवैध हातभट्ट्यांवर तयार होणारी दारू अधिक कडक आणि नशा आणणारी व्हावी, यासाठी दारू तस्कर मानवी जिवाला अत्यंत घातक ठरणारे मेथॅनॉल, युरिया आणि अमोनियम सल्फेट यांसारखी विषारी रसायने वापरत असल्याचे उघड झाले आहे. मोहाची आणि हातभट्टीची दारू स्वस्त आणि सहज उपलब्ध होत असल्याने रोजंदारीवर काम करणारे मजूर, खलाशी आणि कामगार वर्ग या नशेच्या आहारी जात आहे. गरिबांच्या जिवाशी खेळणाऱ्या या तस्करांचे जाळे उद्ध्वस्त करण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे. हे दारू माफिया कारवाईपासून वाचण्यासाठी शेतातील आडवाटेच्या जागा, खाडी किंवा नदीकाठ, नाल्यालगतची घनदाट झाडी अशा दुर्गम ठिकाणांचा वापर करतात. इतकेच नव्हे, तर अनेक गावपाड्यांमध्ये थेट घरांमध्येच गुप्तपणे ही दारू तयार केली जाते.
प्रशासनाने किरकोळ विक्रेते आणि अड्ड्यांवर कारवाई केली असली, तरी जिल्ह्यात छुप्या पद्धतीने चालणारे नकली दारू तयार करणारे मुख्य कारखाने आणि त्यांचे सूत्रधार अद्यापही मोकाट असून या मुख्य अड्ड्यांवर प्रशासन केव्हा हातोडा चालवणार, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. जिल्ह्यात कुठेही अवैध दारूची निर्मिती, वाहतूक किंवा विक्री होत असल्यास नागरिकांनी तात्काळ राज्य उत्पादन शुल्क विभाग कार्यालय किंवा नजीकच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधून तक्रार नोंदवावी, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले असून माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल असे सांगण्यात आले आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *