गोंदिया कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठा राजकीय भूकंप! सभापती भावराव उके, उपसभापती पप्पू पटले यांची खुर्ची गेली
अविश्वास ठराव १५ विरुद्ध ० मतांनी प्रचंड बहुमताने मंजूर
१८ पैकी १५ संचालकांनी दाखवली अभूतपूर्व ताकद
गोंदिया : गोंदिया कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (APMC) राजकारणात मंगळवारी (१८ ऑगस्ट) मोठा आणि ऐतिहासिक राजकीय भूकंप झाला आहे. विद्यमान सभापती भावराव उके आणि उपसभापती राजकुमार उर्फ ‘पप्पू’ पटले यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेला अविश्वास ठराव प्रचंड बहुमताने मंजूर झाला असून, दोघांनाही पदावरून पायउतार व्हावे लागले आहे. बाजार समितीच्या एकूण १८ पैकी तब्बल १५ संचालकांनी एकजूट दाखवत ठरावाच्या बाजूने निर्णायक मतदान केले.
उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली प्रक्रिया
प्राप्त माहितीनुसार, अविश्वास ठरावावर चर्चा व मतदानासाठी उपविभागीय अधिकारी (SDO) चंद्रकांत खंडाईत यांच्या अध्यक्षतेखाली बाजार समितीच्या सभागृहात विशेष सभा बोलवण्यात आली होती. या बैठकीत पीठासीन अधिकाऱ्यांसमक्ष उपस्थित सर्व १५ संचालक व संचालिकांनी हात वर करून ठरावाच्या बाजूने उघडपणे मतदान केले आणि सभापती व उपसभापतींना पदमुक्त करण्याचा निर्णय दिला.
सभापती, उपसभापती राहिले गैरहजर
या राजकीय घडामोडीदरम्यान विशेष बाब म्हणजे ज्यांच्याविरोधात अविश्वास ठराव दाखल करण्यात आला होता, ते सभापती भावराव उके आणि उपसभापती राजकुमार पटले यांच्यासह आणखी एक संचालक असे तिघे बैठकीस गैरहजर राहिले. या तिघांच्या अनुपस्थितीत उर्वरित १५ संचालकांनी अभूतपूर्व ताकद दाखवून सत्ता परिवर्तनाची मोहीम फत्ते केली.

अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान करणारे १५ संचालक:
बाजार समितीत सत्ताबदल घडवून आणण्यासाठी अविश्वास ठरावाच्या बाजूने हात वर करून मतदान करणाऱ्या संचालकांची नावे पुढीलप्रमाणे आहेत:
मुनेश जगन्नाथजी रहांगडाले
धनंजय देऊभाऊजी तुरकर
राजीव रूपचंदजी ठकरेले
ओमेश्वर सुखदेवजी चौधरी
चेतनकुमार भैयाभाऊजी बहेकार
राधाकृष्ण नारायणजी ठाकूर
सौ. कौशल छत्रपालजी तुरकर
सौ. शामकला जीतलालजी पाचे
जितेश लेखनलालजी टेंभरे
पंकज सुंदरलालजी यादव
मुरलीधर भोजरामजी नागपुरे
धनलाल बालचंदजी ठाकरे
अरुण नागोरावजी गजभिये
सुमित लोकेशकुमारजी भालोटिया
विजय नारायणजी उके
या १५ संचालकांच्या भक्कम एकजुटीमुळे गोंदिया एपीएमसीमधील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली असून, आता नव्या सभापती व उपसभापती पदासाठी बाजार समितीच्या वर्तुळात जोरदार हालचाली व चर्चा सुरू झाल्या आहेत.

