सती नदीतील दुर्घटनेत तिघांचा मृत्यू, एक बचावला, संपूर्ण गावावर शोककळा!
कुरखेडा तालुक्यातील खेडेगाव येथील हृदयद्रावक घटना; तीन कुटुंबांचे ‘कुलदीपक’ विझले
मासेमारांच्या सतर्कतेमुळे आव्हाड आमले याचे प्राण वाचले
कुरखेडा (गडचिरोली) : कुरखेडा तालुक्यातील खेडेगाव येथे शनिवारी दुपारी सती नदीत पोहण्यासाठी गेलेल्या तीन बालकांचा बुडून मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी व हृदयद्रावक घटना घडली. या दुर्घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. मात्र, याच दुर्घटनेतून १३ वर्षीय आव्हाड आमले हा सुखरूप वाचला असून, झाडाच्या एका लहान फांदीने ‘बुडत्याला काडीचा आधार’ या म्हणीचा प्रत्यक्ष अनुभव घडवून आणला.
मिळालेल्या माहितीनुसार, १३ वर्षांचा आव्हाड आमले पाण्याच्या वेगात वाहत असताना नदीकाठावरील एका झुडपाच्या फांदीला अडकला. आव्हाडने त्या फांदीला घट्ट पकडून ठेवले. तेथील मासेमारांच्या ही गोष्ट तात्काळ लक्षात येताच त्यांनी प्रसंगावधान राखून नदीत उतरून आव्हाडला सुरक्षितपणे बाहेर काढले. अशा प्रकारे ती फांदी व मासेमार आव्हाडसाठी ‘देवदूत’ ठरले.
शाळेला सुट्टी झाल्यानंतर नदीवर गेले अन् काळाचा घाला!
खेडेगाव येथील रहिवासी लक्ष्मण दुधकंवर, कुणाल दुधकंवर आणि कोवित सराटे हे तिघेही गावातीलच जिल्हा परिषद शाळेत शिकत होते. शनिवारी सकाळी शाळेत गेल्यानंतर सुट्टी झाल्यावर दुपारी हे सर्व जण गावाजवळून वाहणाऱ्या सती नदीच्या घाटावर पोहण्यासाठी गेले होते. पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेही पाण्यात बुडाले.
लक्ष्मणच्या वडिलांचे पाच वर्षांपूर्वीच निधन झाले असून, आता मुलाच्या मृत्यूने कुटुंबात केवळ आई आणि मोठ्या बहिणी उरल्या आहेत. कुणाल हा आपल्या कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. (लक्ष्मण आणि कुणाल हे एकाच दुधकंवर कुटुंबातील होते). तर दुसरीकडे कोवित हा सराटे कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता.
नदीकाठी कुटुंबीयांचा हृदयद्रावक आक्रोश
घटनेची माहिती मिळताच मृत मुलांचे आई-वडील, नातेवाईक आणि ग्रामस्थांनी सती नदीच्या घाटाकडे धाव घेतली. आपल्या निष्पाप चिमुरड्यांचे मृतदेह पाहून कुटुंबीयांनी केलेला आक्रोश उपस्थितांचे काळजात कालवणारा होता. एकाच वेळी तीन कुटुंबांतील वंशाचे दिवे मालवल्याने संपूर्ण खेडेगाव शोकसागरात बुडाले आहे.

