LatestNewsमहाराष्ट्रविदर्भ

बल्लारपुरात कृषी विभागाची मोठी कारवाई, १० लाखांचे ‘एचटीबीटी’ बियाणे जप्त!

विजयवाड्याहून आलेले बियाण्यांचे पार्सल रेल्वे स्थानकावरच पकडले; कारवाईची भणक लागताच ‘इम्तियाज’ फरार!
खरीप हंगाम सुरू होताच बियाण्यांचा काळाबाजार करणारे रॅकेट सक्रिय; कृषी विभागाचा धाडसी पर्दाफाश
५३३ क्विंटल प्रतिबंधित कापूस बियाणे जप्त; पुढील तपासासाठी साठा रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन
बल्लारपूर (चंद्रपूर):
खरीप हंगाम सुरू होताच दरवर्षीप्रमाणे यंदाही शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक करणारे आणि शासनाने बंदी घातलेल्या बियाण्यांचा काळाबाजार करणारे रॅकेट सक्रिय झाले आहे. अशाच एका मोठ्या आंतरराज्यीय रॅकेटचा बल्लारपूर येथे कृषी विभागाने मंगळवार, १५ जून रोजी अत्यंत धाडसी कारवाई करत पर्दाफाश केला. बल्लारशाह रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक एकवर आंध्रप्रदेशातील विजयवाडा येथून आलेले तब्बल १० लाख १२ हजार रुपये किमतीचे अनधिकृत व संशयास्पद ‘एचटीबीटी’ (HTBT) कापूस बियाणे कृषी विभागाने जप्त केले आहे.
मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, जिल्हा परिषदेचे मोहीम अधिकारी लकेश कटरे यांना बल्लारशाह रेल्वे स्थानकावरील पार्सल कार्यालयात मोठ्या प्रमाणावर संशयास्पद कापूस बियाणे आल्याची टीप मिळाली होती. १० मोठ्या प्लास्टिक पिशव्या व २ छोट्या पिशव्यांमध्ये हा साठा दडवून ठेवण्यात आला होता. हा बियाण्यांचा साठा आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथील ‘सईंद इंटरप्रायझेस’कडून बल्लारपूर येथील ‘इम्तियाज’ नामक कुख्यात बियाणे माफियासाठी पाठवण्यात आला होता.
कारवाईची भणक लागताच आरोपी फरार!
रेल्वे स्थानकावर संशयास्पद पार्सल आले असले तरी ते घेण्यासाठी मुख्य संशयित आरोपी इम्तियाज किंवा बियाणे पाठवणारी कंपनी यापैकी कोणीही रेल्वे स्थानकावर फिरकले नाही. कृषी विभागाच्या कारवाईची भणक लागल्यानेच आरोपींनी पळ काढल्याची चर्चा आहे. अखेर १५ जून रोजी जिल्हा परिषदेचे मोहीम अधिकारी लकेश कटरे, जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक श्रावण बोढे व तालुका कृषी कार्यालय बल्लारपूरच्या बियाणे निरीक्षक पल्लवी गोडबोले यांनी पंचांसमक्ष घटनास्थळी जात या पार्सलची कसून तपासणी केली.
५३३ क्विंटल साठा; मुख्य सूत्रधारांचा शोध सुरू
कृषी अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीत ५३३ क्विंटल ३० किलोग्राम वजनाचे अनधिकृत व अनलीगल बीज प्रक्रिया केलेले कापूस बियाणे आढळून आले. कृषी विभागाने हा संपूर्ण १० लाख १२ हजारांचा मुद्देमाल जप्त करून पुढील कायदेशीर कारवाईसाठी बल्लारशाह जीआरपी (रेल्वे पोलीस) ठाण्याच्या सुपुर्द केला आहे. या बियाण्यांची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या आणि विदर्भातील निष्पाप शेतकऱ्यांच्या गळ्यात हे बियाणे मारणाऱ्या मुख्य सूत्रधारांचा शोध आता रेल्वे पोलीस आणि कृषी विभाग घेत आहे.
शेतकऱ्यांनो, बियाणे घेताना सतर्क राहा! “बंदी असलेल्या आणि अनधिकृत एचटीबीटी बियाण्यांची विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचा हा मोठा डाव कृषी विभागाने हाणून पाडला आहे. शेतकऱ्यांनी कोणत्याही अनधिकृत बियाण्यांची खरेदी करू नये. तसेच अशा काळ्याबाजाराची माहिती मिळाल्यास तात्काळ कृषी विभागाशी संपर्क साधावा.” – कृषी विभाग प्रशासन, बल्लारपूर.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *