bal vivah mukt bharat : जागृतीमुळे बालविवाह थांबण्यास प्रशासनाला यश गोरेगाव तालुक्यातील घटना
गोंदिया : गोरेगाव तालुक्यातील पुरगाव (हरिजन टोली) येथे होऊ घातलेला बालविवाह (bal vivah mukt bharat) प्रशासनाच्या तत्परतेमुळे यशस्वीरीत्या थांबविण्यात आला. पोलिसांना बालविवाह होत असल्याची गोपनीय माहिती प्राप्त होताच तात्काळ कार्यवाही करण्यात आली. जिल्हाधिकारी प्रजित नायर, पोलीस अधीक्षक गोरख भामरे तसेच जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीमती रेश्मा आर. मोरे यांच्या आदेशान्वये व मार्गदर्शनाखाली जिल्हा बाल संरक्षण कक्ष, इंडियन सोशल वेलफेअर सोसायटी गोंदिया, दामिनी पथक, चाइल्ड हेल्पलाईन व गोंदिया पोलीस स्टेशन यांची संयुक्त टीम तयार करण्यात आली.
प्राप्त माहितीनुसार संबंधित बालक व बालिकेचे जन्म प्रमाणपत्र ग्रामसेवकांकडून प्राप्त करून तपासणी करण्यात आली. त्यानुसार वराचे वय १८ वर्षे २ महिने १५ दिवस असून (bal vivah mukt bharat) बालविवाह प्रतिबंधक कायदा 2006 नुसार विवाहासाठी आवश्यक वय पूर्ण नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर संयुक्त पथकाने कारवाई करत नवरदेव, नवरी, त्यांचे पालक व नातेवाईकांना ताब्यात घेतले. बालविवाह हा कायद्याने गुन्हा असल्याचे तसेच त्याचे सामाजिक व आरोग्यविषयक दुष्परिणाम सर्वांना समजावून सांगण्यात आले. यानंतर मुलीचे वय 18 वर्षे आणि मुलाचे वय 21 वर्षे पूर्ण झाल्याशिवाय विवाह करणार नाही, असे हमीपत्र व संमतीपत्र बालकांच्या पालकांकडून व नातेवाईकांकडून लिहून घेण्यात आले. सदर संपूर्ण कार्यवाही जिल्हा बाल संरक्षण अधिकारी गजानन गोबाडे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. या मोहिमेत इंडियन सोशल वेलफेअर सोसायटीचे जिल्हा समन्वयक (Access to Justice) ज्ञानेश्वर पटले, धर्मेंद्र भेलावे, अजय खोब्रागडे, अमित बेलेकर, पुजा अनकर, दामिनी पथकाचे प्रशांत बन्सोड, वैशाली भांडारकर, सुवर्णा मडावी, सोनाली टिके तसेच गोंदिया पोलीस स्टेशनचे भागवत दसरिया व राजू नागदेवे सहभागी होते. प्रशासन, पोलीस यंत्रणा व सामाजिक संस्थांच्या समन्वयामुळे आणि जनजागृतीमुळे बालविवाह रोखण्यात यश आले.

