LatestNewsगोंदिया- भंडारामहाराष्ट्रविदर्भ

ब्राम्हणयुवकांनी उद्योजकतेतून प्रगती साधावी : उपजिल्हाधिकारी विजय अवधाने

समग्र ब्राम्हण सभा भगवान परशुराम जन्मोत्सव सोहळा
नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार
गोंदिया :
ब्राह्मण समाजाने आता पारंपारिक चौकटीबाहेर पडून आर्थिक स्वावलंबनाकडे लक्ष दिले पाहिजे. सध्या शासनाच्या ‘अमृत’ प्रमाणे अनेक योजना कार्यान्वित आहेत, ज्याचा लाभ घेऊन समाजातील सुशिक्षित आणि गरजू तरुणांनी स्वतःचा उद्योग उभा करावा. उच्च शिक्षणासाठीही विविध योजना असून समाज बांधवांनी त्याचा लाभ घ्यावा. समाजाची एकजुटता हीच प्रगतीची पहिली पायरी आहे. आपल्या वेदांनी दिलेले मंत्र शक्तिशाली आणि प्रभावी असून त्यांची साधना करणे अत्यंत गरजेचे आहे, हे संस्कार आपण आपल्या पुढील पिढीला द्यावेत, असे उद्गार गोंदियाचे उपजिल्हाधिकारी विजय अवधाने यांनी काढले. ते समग्र ब्राह्मण सभेद्वारे स्वातंत्र्यसंग्राम सेनानी स्व. पं. सत्यनारायण मिश्रा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित भगवान परशुराम जन्मोत्सव सोहळ्यात बोलत होते.

पं.अरुण दुबे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या कार्यक्रमात व्यासपीठावर बालाघाट जिल्हा परिषद सदस्य श्रीमती मधू शुक्ला, समग्र ब्राह्मण सभेचे संयोजक पं. निलेश चौबे, संयोजक अतुल दुबे, पं. विनय मिश्रा, पं. जगदीश मिश्रा, पं. देवेश मिश्रा उपस्थित होते. श्रीमती मधू शुक्ला यांनी आपल्या ओजस्वी वाणीने समाज बांधवांमध्ये उत्साह भरला. त्या म्हणाल्या की, ब्राह्मण हे भगवान परशुराम यांचे वंशज आहेत, ज्यांच्या एका हातात शास्त्र आणि दुसर्‍या हातात शस्त्राचा समतोल आहे. आपण आपल्या सुप्त शक्तींना पुन्हा जागृत केले पाहिजे. जर कोणी समाजाच्या उदारतेला कमजोरी समजत असेल किंवा अन्याय करत असेल, तर त्याला प्रतिकाराच्या माध्यमातून आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देणे अनिवार्य आहे. समाजाने आपल्या संस्कृती आणि संस्कारांच्या माध्यमातून संपूर्ण राष्ट्राला मार्ग दाखवावा, असे आवाहनही त्यांनी केले. संयोजक निलेश चौबे यांनी प्रास्ताविक भाषणात नमूद केले की, गेली १६ वर्षे हा उपक्रम अविरतपणे सुरू असून तो आता एक गौरवशाली परंपरा बनला आहे. स्वातंत्र्यसेनानी स्व. सत्यनारायण मिश्रा यांच्या पावन स्मृतीमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, ज्यांच्या जीवनीवर पं. अतुल दुबे यांनी प्रकाश टाकला.
याप्रसंगी नगर परिषद निवडणुकीत विजय मिळविलेल्या नगरसेवकांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. यामध्ये श्रीमती निर्मला दिलीप मिश्रा (सभापती), विवेक दिनेश मिश्रा (भाजप गटनेते), राज मनोज शुक्ला (राष्ट्रवादी काँग्रेस गटनेते), दुर्गा सुनील तिवारी, एड. सरिता संजीव कुलकर्णी, शिवकुमार शर्मा आणि नीती विनोद राय यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन पं. जयंत शुक्ला यांनी केले तर आभार पं. सचिन (बंटी) मिश्रा यांनी मानले. समारंभाची सुरुवात भगवान परशुरामांचे पूजन, दीपप्रज्वलनाने आणि सांगता महाप्रसाद वितरणाने झाली. या प्रसंगी मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.
……………………………
जय परशुरामच्या जयघोषाने दुमदुमली गोंदिया नगरी
भगवान परशुराम जन्मोत्सवाच्या निमित्ताने १९ एप्रिल रोजी काढण्यात आलेल्या भव्य शोभायात्रेने संपूर्ण गोंदिया ‘परशुराममय’ झाले होते. सिव्हिल लाईन येथील महिला समाज भवन येथून निघालेल्या या शोभायात्रेत पारंपारिक वेशभूषेतील समाजबांधव, मातृशक्ती आणि युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आकर्षक देखावे, डीजे, ढोल-ताशा आणि ‘जय परशुराम’च्या गगनभेदी जयघोषाने ब्राह्मण समाजाची एकजुट दिसून आली. तत्पूर्वी १८ एप्रिल रोजी आयोजित वाहन रॅली आणि भजन संध्येमुळे वातावरण धर्ममय झाले होते.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *