LatestNewsगोंदिया

district court gondia : विनयभंग प्रकरणात आरोपीला सश्रम कारावास

साडेचार वर्षांची शिक्षा : जिल्हा न्यायालयाचा निर्वाळा
गोंदिया :
गावी परत असलेल्या महिलेची छेड काढून विनयभंग करणार्‍या आरोपीला जिल्हा न्यायालयाने (district court gondia) शिक्षा सुनावली आहे. प्रकरणाचा निर्वाळा देताना साक्ष व पुरावे तपासून न्यायालयाने आरोपीला साडेचार वर्ष सश्रम कारावास व ५ हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावलीआहे. हा निर्वाळा १७ सप्टेंबर रोजी प्रमुख जिल्हा व विशेष सत्र न्यायाधीश आर.एन.जोशी यांना सुनावला. संजय राधेश्याम गायधन (३३) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.
सविस्तर असे की, ७ ऑक्टोबर २०२१ रोजी ३० वर्षीय पीडित महिला आपल्या माहेरून गावी परत येत असताना, दुपारी २ वाजताच्या सुमारास थकल्यामुळे एका झाडाखाली थांबली. त्यावेळी आरोपी संजय राधेश्याम गायधने (वय ३३, रा. महाजनटोला, ता. गोरेगाव) तिच्याजवळ आला. त्याने तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न करत दोन्ही हात पकडले, तिची छाती दाबली, अश्लील शिवीगाळ केली आणि जिवे मारण्याची धमकी देऊन तिचा विनयभंग केला. या घटनेनंतर पीडितेने आपल्या सासरच्या लोकांना ही बाब सांगितली आणि गोरेगाव पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली. तत्कालीन तपास अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी जालींदर नालकूल यांनी सविस्तर तपास करून न्यायालयात (district court gondia) दोषारोपपत्र दाखल केले.
या प्रकरणात आरोपीविरुद्ध पुरावा सिद्ध करण्यासाठी सरकारी पक्षाच्या वतीने जिल्हा सरकारी वकील श्री. महेश स. चंदवानी आणि अति. सरकारी वकील श्री. कृष्णा डी. पारधी यांनी एकूण ७ साक्षदारांची साक्ष नोंदवली. मा. न्यायालयाने सरकारी पक्षाचा पुरावा ग्राह्य धरून आरोपी संजय गायधने याला विविध कलमांतर्गत शिक्षा सुनावली:
कलम ३५४ अंतर्गत २ वर्षांचा सश्रम कारावास
कलम ५०९ अंतर्गत १ वर्षांचा साधा कारावास
कलम ५०६ अंतर्गत १ वर्षांचा सश्रम कारावास
कलम ३२३ अंतर्गत ६ महिन्यांचा सश्रम कारावास
या सर्व शिक्षा एकत्रितपणे भोगल्यानंतर त्याला एकूण ४ वर्ष ६ महिन्यांचा सश्रम कारावास भोगावा लागेल. यासोबतच ५,००० रुपये दंडाची शिक्षाही ठोठावण्यात आली.
आरोपीने आपल्यावर अवलंबून असलेले कुटुंब आणि गरिबीचा हवाला देत शिक्षेतून सूट देण्याची विनंती केली. मात्र, न्यायालयाने ही विनंती अमान्य केली. न्यायाधीश मा. आर. एन. जोशी यांनी म्हटले की, शेतात, कामावर किंवा शाळेत जाणार्‍या महिला व मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न सध्या ऐरणीवर आहे. समाजात अशा गुन्ह्यांबाबत तीव्र रोष असून, भविष्यात असे गुन्हे घडू नयेत यासाठी आरोपीला कठोर शिक्षा देणे महत्त्वाचे आहे. या प्रकरणात अतिरिक्त पोलीस अधीक्षक अभय डोंगरे आणि पोलीस निरीक्षक रामेश्वर पिपरेवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पैरवी कर्मचारी प्रकाश शिरसे यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *