महामंडळाचा निष्काळजीपणा: कमलापुरात खरेदी केलेला हजारो क्विंटल धान सडला; कोट्यवधींचे नुकसान!
आदिवासी विकास महामंडळाचे नियोजन कोलमडले; धान सडल्याने परिसरात प्रचंड दुर्गंधी, नागरिकांचे आरोग्य धोक्यात
गडचिरोली (२५ जून): आदिवासी विकास महामंडळाच्या ढिसाळ कारभाराचा आणि अक्षम्य दुर्लक्षाचा एक धक्कादायक नमुना गडचिरोली जिल्ह्यात समोर आला आहे. अहेरी उपप्रादेशिक कार्यालयांतर्गत येणाऱ्या कमलापूर येथील धान खरेदी केंद्रावर गेल्या दोन वर्षांपासून खरेदी करण्यात आलेला हजारो क्विंटल धान उघड्यावर पडून सडला आहे. महामंडळाच्या या भोंगळ कारभारामुळे शासनाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असून, सडलेल्या धानामुळे परिसरात भयानक दुर्गंधी पसरली आहे. यामुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
दोन वर्षांपासून धान राईस मिलमध्ये पाठवलाच नाही!
सरकारी नियमांनुसार, हमीभावाने धानाची खरेदी केल्यानंतर तातडीने लिलाव प्रक्रिया पूर्ण करून तो धान भरडाईसाठी (मिलिंग) राईस मिलमध्ये पाठवणे बंधनकारक असते. मात्र, कमलापूर केंद्रावर महामंडळाच्या अत्यंत खराब प्लॅनिंगमुळे आणि अधिकार्यांच्या हेकटपणामुळे गेल्या दोन वर्षांपासून खरेदी केलेला धान तिथून उचलण्यातच आला नाही. तो तसाच उघड्यावर पडून राहिला.
निसर्गाची अवकृपा की अधिकार्यांचे पाप?
आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या माध्यमातून दरवर्षी शेतकऱ्यांकडून लाखो क्विंटल धान खरेदी केला जातो. मात्र, योग्य नियोजनाअभावी हा धान केंद्रावर उघड्यावरच पडून राहतो. पावसाच्या पाण्यात भिजून दरवर्षी कोट्यवधी रुपयांचे अन्नधान्य मातीमोल होते. कमलापूर केंद्रावरही नेमके हेच घडले. वेळेवर लिलाव न झाल्याने आणि पावसाच्या पाण्यात सडल्यामुळे हा संपूर्ण धान आता नष्ट झाला आहे. या सडलेल्या धानामुळे केवळ आर्थिक नुकसानच झाले नाही, तर संपूर्ण कमलापूर परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे. या घाणीमुळे परिसरात रोगराई पसरण्याची भीती निर्माण झाली असून लोकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे. एवढी मोठी गंभीर परिस्थिती निर्माण झाली असतानाही महामंडळाचे अधिकारी मात्र सुस्त असून याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करत असल्याचा संतापजनक आरोप नागरिकांमधून केला जात आहे. या कोट्यवधींच्या नुकसानीला जबाबदार असणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई कधी होणार, असा संतप्त सवाल आता ‘देशोन्नती’च्या माध्यमातून विचारला जात आहे.


