थक्क करणारी घटना! चक्क बैलावर बसून शेतकरी घुसला तहसील कार्यालयात
कर्जमुक्तीच्या घोषणांनी तहसील परिसर दणाणला; उपस्थित नागरिकांमध्ये चर्चेला उधाण
राजुरा (चंद्रपूर ) : शेतकरी कर्जमाफी आणि संपूर्ण कर्जमुक्तीच्या मागणीसाठी आज दि. २३ रोजी राजुरा तहसील कार्यालयात एका शेतकऱ्याने अत्यंत आगळेवेगळे आंदोलन करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. नेहमीच्या मोर्चा किंवा धरणे आंदोलनांपेक्षा वेगळा मार्ग निवडत हा शेतकरी चक्क बैलावर स्वार होऊन तहसील कार्यालय परिसरात दाखल झाला. यावेळी त्याने दिलेल्या कर्जमाफीच्या जोरदार घोषणांमुळे संपूर्ण तहसील परिसर दणाणून गेला होता. या अनोख्या आंदोलनामुळे तहसील कार्यालयात काही काळ मोठी गर्दी झाली होती.
“कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आधीच प्रचंड अडचणीत असताना शासन ठोस उपाययोजना केव्हा करणार?” असा थेट प्रश्न उपस्थित करत आंदोलनकर्त्या शेतकऱ्याने कर्जमाफीची आपली मागणी पुन्हा एकदा प्रशासनासमोर अधोरेखित केली. वाढता शेती खर्च, लागोपाठ येणारी नैसर्गिक संकटे आणि पिकांचे घटते उत्पादन यांमुळे शेतकरी पार कोलमडून गेला आहे. कर्जाचा वाढता बोजा असह्य झाल्याने त्रस्त झालेल्या या शेतकऱ्याने प्रशासनाचे झोपलेले लक्ष वेधण्यासाठी हा अनोखा मार्ग निवडल्याचे सांगितले. बैलावर बसून तहसील कार्यालय परिसरात फेरी मारत त्याने ‘शेतकरी कर्जमुक्त करा’, ‘कर्जमाफी द्या’, ‘शेतकऱ्यांना न्याय द्या’ अशा तीव्र घोषणा दिल्या.
नागरिक आणि कर्मचारी अवाक; आंदोलनाने वेधले लक्ष
अचानक घडलेल्या या प्रकारामुळे तहसील कार्यालयातील शासकीय कर्मचारी, विविध कामांसाठी आलेले नागरिक तसेच परिसरातील लोक पूर्णपणे आश्चर्यचकित झाले. अनेकांनी आपल्या मोबाईलमध्ये या अनोख्या आंदोलनाचे छायाचित्रण आणि व्हिडिओ शूटिंग केले. काही काळ संपूर्ण राजुरा तहसील परिसरात केवळ याच आंदोलनाची चर्चा रंगली होती.
ग्रामीण संस्कृतीचे प्रतीक असलेल्या बैलाच्या माध्यमातून शेतकऱ्याने आपली व्यथा मांडण्याचा अतिशय प्रभावी प्रयत्न केल्याची भावना उपस्थित नागरिकांमध्ये व्यक्त होत होती.
तातडीने कर्जमाफी देण्याची मागणी
आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्याचे म्हणणे आहे की, वारंवार नैसर्गिक संकटांचा सामना करताना शेतकरी आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे खचला आहे. पिकांना योग्य भाव मिळत नसल्याने आणि कर्जाचा बोजा सातत्याने वाढत असल्याने अनेक शेतकरी टोकाचे पाऊल उचलण्याच्या उंबरठ्यावर आहेत. त्यामुळे शासनाने आता कोणतीही दिरंगाई न करता तातडीने सरसकट कर्जमाफीचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांना मोठा दिलासा द्यावा, अशी मागणी या आंदोलनाद्वारे करण्यात आली आहे.


