LatestNewsमहाराष्ट्रविदर्भ

प्रशासनाच्या मनमानी कारभाराविरुद्ध वढोलीत जनक्षोभ; दारू दुकानाविरोधात गावकऱ्यांचा ‘रास्ता रोको’!

● ३० वर्षांची दारूबंदी मोडीत काढण्याचा घाट; संतापलेल्या महिला व ग्रामस्थ रस्त्यावर उतरले
● गोंडपिंपरी-मूल मार्गावरील वाहतूक तासनतास ठप्प; पोलीस आणि महसूल प्रशासनाची घटनास्थळी धाव
गोंडपिंपरी (चंद्रपूर):
गेल्या ३० वर्षांपासून गावात शांतता आणि सुव्यवस्था राखणारी दारूची बंदी प्रशासनाने एका फटक्यात मोडीत काढल्याने वढोली येथील ग्रामस्थांचा संताप अनावर झाला. वढोली गावात नव्याने सुरू करण्यात आलेल्या दारू दुकानाविरोधात शुक्रवारी (दि. १९) संतप्त महिला आणि गावकऱ्यांनी थेट गोंडपिंपरी-मूल महामार्गावर उतरून दारू दुकानाच्या समोरच ठिय्या मांडत ‘रास्ता रोको’ आंदोलन केले. प्रशासनाने गावकऱ्यांच्या लोकभावनेला केराची टोपली दाखवून हे दुकान सुरू केल्याचा आरोप करत, जोपर्यंत दुकान हटत नाही तोपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
वढोली गावात गेल्या ३० वर्षांपासून कडक दारूबंदी लागू आहे. सन १९९१ मध्येच गावकऱ्यांनी एकजुटीने मोठा संघर्ष करून येथील शासनमान्य देशी दारूचे दुकान बंद पाडले होते. या ऐतिहासिक दारूबंदीची परंपरा कायम राखत यंदाही ग्रामपंचायतीने “गावात दारू दुकान नको” असा अधिकृत ठराव एकमताने मंजूर केला होता. हा ठराव राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे रीतसर पाठवूनही प्रशासनाने त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. ग्रामसभेच्या आणि ग्रामपंचायतीच्या ठरावाला डावलून गावात दारू दुकान सुरू करण्याची परवानगी दिल्यामुळेच हा जनक्षोभ उसळल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.
चक्काजाममुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प शेकडो महिलांनी हातात फलक घेत रस्त्यावर ठिय्या आंदोलन सुरू केल्यामुळे गोंडपिंपरी-मूल मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. आंदोलनाची वाढती तीव्रता आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचे पाहता उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यजित आमले, तहसीलदार शुभम बहाकर, ठाणेदार हेमंत पवार आणि पोलीस उपनिरीक्षक मंगेश कराडे यांनी तात्काळ फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली. अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांशी चर्चा करून परिस्थिती नियंत्रणात आणली, मात्र दुकान बंद होईपर्यंत माघार घेणार नसल्याचा पवित्रा गावकऱ्यांनी कायम ठेवला आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *