वाघिणीच्या साम्राज्यासाठी माय-लेकींमध्ये ‘गनिमी कावा’!
उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यात ‘एक्स मार्क’ अन् ‘एच मार्क’ मध्ये थरारक झुंज; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
उमरेड (नागपूर) : निसर्गाचा नियम आहे की, वाघिणीचे बछडे दोन वर्षांचे झाले की ती त्यांना स्वतःपासून दूर सारते. मात्र, उमरेड-कऱ्हांडला वन्यजीव अभयारण्यात या निसर्गाच्या नियमाला छेद देणारी एक थक्क करणारी घटना समोर आली आहे. आपल्याच आईच्या साम्राज्यावर (अधिवास) ताबा मिळवण्यासाठी एका दोन वर्षांच्या वाघिणीने चक्क आईविरुद्धच बंड पुकारले आहे. ‘एक्स मार्क’ नावाच्या वाघिणीसोबत तिच्याच ‘एच मार्क’ नावाच्या लेकीचा सुरू असलेला हा अधिवास संघर्ष सध्या वन्यप्रेमींमध्ये कमालीच्या कुतूहलाचा विषय ठरला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यातील प्रसिद्ध ‘कॉलरवाली’ वाघिणीची मुलगी ‘एक्स मार्क’ हिने महिनाभरापूर्वी चार नवीन बछड्यांना जन्म दिला आहे. सध्या ती सतीघाट तलाव परिसरात या नवजात पिल्लांच्या संरक्षणात व्यस्त आहे. मात्र, तिच्या आधीच्या वेतातील दोन वर्षांची मादी बछडी ‘एच मार्क’ अजूनही आईचा परिसर सोडायला तयार नाही. आईने तिला दूर हुसकावण्याचा प्रयत्न केला असता, ‘एच मार्क’ने चक्क आईच्याच हक्काच्या क्षेत्रावर दावा ठोकला आहे.
या माय-लेकींमधील सत्तेची लढाई जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सूर्यनाला परिसरात पाहायला मिळाली होती. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी पुन्हा एकदा त्यांच्यात जोरदार झुंज झाली. जंगलाची शांतता भंग करणाऱ्या या थरारक लढतीचा व्हिडिओ पर्यटकांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केला असून, सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
…………
थोडक्यात समजून घ्या वाघांची ‘फॅमिली ट्री’
आजी-आजोबा: चार्जर आणि कॉलरवाली (ज्यांचा वावर पूर्वी कऱ्हांडला, ठाणा तलाव परिसरात होता).
आई (एक्स मार्क): धामणा वॉटरहोल, नर्सरी आणि आरेकर तिप्पट परिसराची ‘राणी’.
बंडखोर मुलगी (एच मार्क): दोन वर्षांची तरूण वाघीण, जिने आता आईविरुद्धच युद्ध पुकारले आहे.
………..
साम्राज्य कुणाचे? वन्यप्रेमींचे लक्ष
वाघांच्या जगात स्वतःची ‘टेरिटरी’ (अधिवास) निर्माण करण्यासाठी रक्तपिपासू संघर्ष नवा नाही, मात्र पोटच्या लेकीनेच आईच्या साम्राज्याला दिलेले हे आव्हान अत्यंत दुर्मिळ मानले जात आहे. या महायुद्धाच्या अखेरीस उमरेड-कऱ्हांडलाच्या या विस्तीर्ण भूभागावर ‘एक्स मार्क’ आपले वर्चस्व कायम ठेवणार की तरुण ‘एच मार्क’ आईला हुसकावून नवीन ‘राणी’ बनणार? याकडे आता संपूर्ण महाराष्ट्रातील वन्यप्रेमींचे डोळे लागले आहेत.

