LatestNewsगोंदियागोंदिया- भंडाराबातमीमहाराष्ट्र

सरन्यायाधीश यांच्यावरील हल्ल्याचा राजकुमार बडोले फाउंडेशन तर्फे निषेध

गोंदिया : सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या दिशेने करण्यात आलेल्या बूटफेकीच्या प्रयत्नाचा प्रकार हा अत्यंत निंदनीय, अशोभनीय आणि लोकशाही मूल्यांवर हल्ला आहे. त्याचा राजकुमार बडोले फाउंडेशन तर्फे तीव्र निषेध आहे.या संदर्भात फाउंडेशनच्या प्रतिनिधींनी गोंदिया जिल्हाधिकाऱ्याना निवेदन सादर केले.

न्यायासन हे केवळ एका व्यक्तीचे नव्हे तर राष्ट्राच्या न्यायबुद्धीचे आणि संविधानिक प्रतिष्ठेचे प्रतीक असते. त्यामुळे अशा व्यक्तीवर हल्ला करणे म्हणजे न्यायसंस्थेचा आणि अप्रत्यक्षपणे भारतीय लोकशाहीचा अपमान होय. विचारभेद आणि असंतोष हे लोकशाहीत स्वाभाविक असले तरी त्याची अभिव्यक्ती हिंसा, अवमान किंवा अपमानाच्या स्वरूपात होत असेल, तर ती प्रवृत्ती समाजात अराजकता आणि अविश्वास निर्माण करते.या घटनेतून काही तथाकथित “सनातनी” घटकांची असहिष्णु आणि नीच प्रवृत्ती उघड झाली आहे, जी लोकशाही संवादाच्या मूळावरच घाव घालते. अशा हिंसक कृती करणे हे केवळ कायद्याचा नव्हे तर भारतीय संस्कृतीतील संयम, संवाद आणि आदर यांच्या परंपरेचाही अपमान आहे. राजकुमार बडोले फाउंडेशनने सरकार आणि कायदा अंमलबजावणी यंत्रणांना आवाहन केले आहे की — दोषींवर तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी, जेणेकरून भविष्यात अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत. परंतु अद्यापही संबंधित वकिलावर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, हे अतिशय खेदजनक आहे. न्यायालयाने तक्रार केली नाही म्हणून पोलिस कारवाई करत नाहीत, हे कारण ग्राह्य धरता येणार नाही — कारण पोलिसांचे कर्तव्य म्हणजे कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर स्वयंस्फूर्तपणे कार्यवाही करणे होय. न्यायव्यवस्थेचा सन्मान आणि संविधानाचा गौरव टिकवणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. विवेक, संयम आणि सन्मान यांच्या मार्गावर राहणे, हेच लोकशाहीचे खरे रक्षण आहे, असे फाउंडेशनच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.या वेळी फाउंडेशनचे सचिव प्रशांत शहारे, राकेश भास्कर, हितेश डोंगरे, मिथुन टेंभुर्णे, टुनेश तरजुले, डायमंड डोंगरे, अजय शहारे, संजीव लोणारे, अमित राऊत, हर्षद साखरे, अमोल नंदेश्वर, अक्षय जांभूळकर, सम्यक रामटेके, विपील डोंगरे, राकेश जनबंधू, विक्रम जनबंधू, किशोर बलोदे, जयराम सांगोळकर, ध्रुव तरजुले, साजन शहारे, योगेश सांगोळकर, चंदू शहारे, बिंबिसार शहारे, आस्तिक बनसोड, शैलेंद्र शहारे, मिलिंद डोंगरे, सुरेश शहारे, विनोद सांगोळे, अनिल मेश्राम, नागेश वैद्य, अश्वजीत राऊत, अमन राऊत, छोटू वैद्ये, जनार्धन डोंगरे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

…………………………

व्यक्तीवर नाही, न्यायव्यवस्थेवर हल्ला- आ.राजकुमार बडोले

सरन्यायधीशांवरील हल्ल्याचा निषेध देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर कोर्टरूममध्ये हल्ला झाला. हा हल्ला एका व्यक्तीवर नव्हे, तर भारतीय न्याय व्यवस्थेवर आहे. लोकशाहीच्या मुल्यावर हल्ला आहे. देशाच्या इतिहासातील सर्वाधिक लज्जास्पद घटना आहे. या शब्दात माजी समाजकल्याण मंत्री आ. राजकुमार बडोले यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला. ते म्हणाले , वकिल न्यायाचा पुजारी असतो. त्या वेषातील या कृत्याने जगात न्यायप्रिय भारताची प्रतिमा डागाळली. ही घटना संविधान, सामाजिक न्याय आणि समानतेच्या तत्वावर हल्ला आहे. हा देश संविधानावर चालतो.हा देश न्यायाचा आहे.समानतेचा आहे. कुणाच्याही जाती-धर्माचा नाही. या प्रकरणी आरोपीला कठोर शिक्षा करावी. माफी नाही. या घटनेमुळे देश व्यथित आहे. बडोले म्हणाले, महाराष्ट्राच्या पूत्रावरील हा हल्ला महाराष्ट्र अस्मितेवरही हल्ला आहे. संविधानाचे रक्षणकर्ते सुरक्षित नाहीत. त्यांना अपमानित व्हावे लागत असेल तर सामान्य माणसाचा न्याय व्यवस्थेवरील विश्वास उडेल. ते टाळण्यास आरोपीवर कठोर कारवाई झालीच पाहिजे असेही ते म्हणाले.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *