LatestNewsगोंदिया- भंडारामहाराष्ट्रविदर्भ

ACB : महिला तलाठी १० हजारांची लाच स्वीकारताना एसीबीच्या जाळ्यात

अवैध माती उत्खननावर कारवाई न करण्यासाठी मागितली होती ३५ हजारांची लाच

गोंदिया : विटभट्टी व्यवसायासाठी लागणाऱ्या मातीच्या अवैध उत्खननावर कारवाई न करण्याच्या बदल्यात ३५ हजार रुपयांची लाच मागून, त्यापैकी १० हजार रुपयांचा हप्ता स्वीकारताना अर्जुनी मोरगाव तहसील कार्यालयांतर्गत साजा निमगाव क्र. १० येथील महिला तलाठी श्रीमती गायत्री बोरकर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले. सोमवारी सायंकाळी ही धडक कारवाई करण्यात आली असून यामुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे.या प्रकरणातील ४२ वर्षीय तक्रारदार हे विटभट्टी व्यावसायिक असून, ते विटा बनवण्यासाठी परिसरातील शेतकऱ्यांकडून माती विकत घेतात. मागील वर्षी मार्च २०२५ मध्ये देखील आरोपी तलाठी बोरकर यांनी तक्रारदाराला “तुम्ही मातीचे अवैध उत्खनन करता” अशी भीती दाखवून ३३ हजार रुपये उकळले होते. त्यानंतर यावर्षी पुन्हा १२ मार्च २०२६ रोजी बोरकर यांनी तक्रारदाराला फोन करून अवैध माती उत्खननावर कारवाई न करण्यासाठी ३७ हजार रुपयांची मागणी केली. त्यापैकी १० हजार रुपये त्याच दिवशी स्वीकारले आणि उर्वरित २७ हजार रुपयांसाठी तगादा लावला. लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने तक्रारदाराने २३ मार्च रोजी एसीबी गोंदिया कार्यालयाशी संपर्क साधून तक्रार नोंदवली.तक्रारीची शहानिशा करण्यासाठी एसीबीच्या पथकाने अर्जुनी मोरगाव येथे सापळा रचला. पंचांसमक्ष करण्यात आलेल्या पडताळणीत आरोपी बोरकर यांनी तडजोडीअंती एकूण ३५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यापैकी १० हजार रुपये २३ मार्चला स्वीकारण्याचे मान्य करून उर्वरित १५ हजार रुपये २४ मार्चला देण्याचे ठरले. सोमवारी सायंकाळी १० हजार रुपयांची लाच स्वीकारताच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने बोरकर यांना रंगेहाथ ताब्यात घेतले. त्यांच्याकडून लाचेची रक्कम आणि ३ हजार रुपये किमतीचा रिअलमी कंपनीचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे.आरोपी महिला लोकसेवक असल्याने सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, त्यांना रात्री अटक न करता २४ मार्च रोजी सकाळी ७ वाजता पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे सूचना पत्र (नोटीस) देऊन पतीच्या ताब्यात देण्यात आले आहे. सध्या आरोपीच्या घराची झडती घेण्याची प्रक्रिया सुरू असून अर्जुनी मोरगाव पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही यशस्वी कारवाई नागपूर परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक डॉ. दिगंबर प्रधान, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती माधुरी बाविस्कर आणि श्री. विजय माहुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उमाकांत उगले, अरविंद राऊत, सहायक फौजदार चंद्रकांत करपे, पोलीस हवालदार संजय बोहरे, मंगेश काहालकर, पोलीस नाईक संतोष शेंडे, अशोक कापसे, संतोष बोपचे, प्रशांत सोनवणे, कैलास काटकर, महिला पोलीस शिपाई संगीता पटले, रोहिणी डांगे आणि चालक दीपक बाटबर्वे यांनी केली आहे. कोणत्याही शासकीय कामासाठी कुणी लाचेची मागणी करत असेल, तर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, गोंदिया यांच्याशी किंवा टोल-फ्री क्रमांक १०६४ वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

गोंदिया जिल्ह्यातील नागरिकांना भ्रष्टाचाराविरोधात सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोणत्याही शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांनी स्वतः किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजंट) मार्फत शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर शुल्काव्यतिरिक्त लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी तात्काळ तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. अशा प्रकारच्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेणे गरजेचे असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. लाचेची मागणी झाल्यास नागरिकांनी विलंब न करता अँटी करप्शन ब्युरो, गोंदिया येथे संपर्क साधावा. तक्रार नोंदविण्यासाठी टोल फ्री क्रमांक 1064 उपलब्ध असून, नागरिकांच्या सहकार्यामुळे भ्रष्टाचाराविरोधात प्रभावी कारवाई होण्यास मदत होणार आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *