कन्हाण नदीत बुडून एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू; कामठी परिसरातील हृदयद्रावक घटना
६ वर्षीय चिमुरड्याला वाचवण्याच्या प्रयत्नात काकासह अन्य एका नातेवाईकाने गमावले प्राण, रविवारच्या सुटीत वनभोजनादरम्यान काळाचा घाला
नागपूर/कामठी : उन्हाच्या तीव्र चटक्यांपासून थोडा विरंगुळा मिळावा आणि रविवारची सुटी कुटुंबासोबत आनंदात घालवावी, या उद्देशाने कन्हाण नदीकाठावरील शिवमंदिरात गेलेल्या दोन कुटुंबांवर काळाने भीषण घाला घातला. कन्हाण नदीच्या पात्रातील खोल डोहात बुडणाऱ्या एका ६ वर्षीय चिमुरड्याला वाचवण्याच्या प्रयत्नात त्याच्या काकासह आणखी एका नातेवाईकाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना रविवारी दुपारी जुनी कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. या घटनेमुळे परिसरात तीव्र शोककळा पसरली आहे. चैतन्य बबलू अंबाडे (वय ६ वर्ष, रा. इंदिरानगर, जरीपटका), गौतम राजकुमार अंबाडे (वय ३१ वर्ष) आणि रोहित कैलास नागदेवे (वय ३३ वर्ष, रा. कुंभारे कॉलनी, कामठी) अशी मृत पावलेल्यांची नावे आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, जरीपटका व कामठी परिसरातील अंबाडे आणि नागदेवे कुटुंबातील सुमारे १२ ते १३ सदस्य रविवारची सुटी आणि वाढत्या उकाड्यामुळे दोन वाहनांनी जुनी कामठी परिसरातील कन्हाण नदीकाठी असलेल्या शिवमंदिरात दर्शनासाठी गेले होते. सकाळी सर्वांनी मंदिरात दर्शन घेतले आणि नदीकाठी आनंदाने वेळ घालवत होते. दुपारच्या सुमारास दोन्ही कुटुंबांतील सदस्य वनभोजनाच्या (स्वयंपाकाच्या) तयारीत व्यस्त होते.दुपारी १ वाजताच्या सुमारास ६ वर्षांचा चिमुरडा चैतन्य नदीपात्रात खेळण्यासाठी उतरला. मात्र, पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो अचानक खोल पाण्यात गेला आणि बुडू लागला. त्याला बुडताना पाहून त्याचे काका गौतम अंबाडे आणि नातेवाईक रोहित नागदेवे यांनी त्याला वाचवण्यासाठी नदीत उड्या घेतल्या. परंतु, डोहाच्या खोलीचा व पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने ते तिघेही पाण्यात बुडाले.वडिलांनी दिली मृत्यूशी झुंजतिघांना पाण्यात बुडताना पाहून गौतमचे ५५ वर्षीय वडील राजकुमार अंबाडे यांनीही त्यांना वाचवण्यासाठी नदीत उडी घेतली. दुर्दैवाने तेही मानेपर्यंत पाण्यात बुडाले होते, मात्र त्यांनी धीर न सोडता मृत्यूशी निकराची झुंज दिली. कसेतरी हातपाय मारून त्यांनी स्वतःचे प्राण वाचवले आणि ते पाण्याच्या बाहेर आले.जेवण तिथेच पडून राहिले; उपस्थितांचे डोळे पाणावलेदोन्ही कुटुंबांनी रविवारी वनभोजनाचा आनंद घेण्यासाठी सर्व जेवणाची सामग्री सोबत आणली होती. मात्र, निसर्गाच्या सान्निध्यात आनंदाने चार घास घेण्यापूर्वीच काळाने झдप घातली. घटनेनंतर तयार केलेले जेवण आणि आणलेली सामग्री घटनास्थळावर जशीच्या तशी पडून राहिली. या विदारक दृश्यामुळे घटनास्थळी उपस्थित असलेल्या सर्वांचेच डोळे पाणावले होते.जीवघेणा डोह ठरतोय मृत्यूचा सापळा; सुरक्षेची मागणीकन्हाण नदीच्या महादेव घाट परिसरातील हा डोह अत्यंत खोल आणि धोकादायक आहे. यापूर्वीही या डोहात बुडून अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. हा डोह पर्यटकांसाठी मृत्यूचा सापळा ठरत असून, प्रशासनाने या ठिकाणी तत्काळ धोक्याचे फलक लावावेत आणि सुरक्षेच्या आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी तीव्र मागणी आता स्थानिक नागरिकांमधून केली जात आहे. जुनी कामठी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

