बंध जिव्हाळ्याचे, स्नेह उपचारांचे- डॉ पुरुषोत्तम पटले
गोंदिया : मानवतेचे मूल्य हेच आपले सर्वात मोठे बळ आहे. आरोग्य विभाग या मूल्यांच्या जोपासनेसाठी आणि लोकांच्या आरोग्य सुधारण्यासाठी सातत्याने कार्यरत आहे – जिल्हा शल्य चिकित्सक डॉ पुरुषोत्तम पटले यांनी राखी पौर्णिमा निमित्ताने आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले.
राखी पौर्णिमेचा उत्सव हा केवळ भाऊ-बहिणींचा नात्याचा सण नसून, मानवी मूल्ये आणि परस्परांच्या काळजीचे प्रतीक आहे. यंदा वि. सा. सामान्य रुग्णालय के टी एस मध्ये येथे हा सण मा. जिल्हाशल्यचिकित्सक डॉ पुरुषोत्तम पटले यांच्या अध्यक्षतेखली व वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुवर्णा हुबेकर आणि यांच्या मार्गदर्शनाखाली एक वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. डॉक्टर आणि नर्सेसनी रुग्णांना राख्या बांधून त्यांना प्रेम, आश्वासन आणि आत्मीयतेचे संदेश भेटरूपी दिले.रुग्णांच्या चेहऱ्यावरचे आनंदाचे हास्य, त्यांच्या डोळ्यात आलेले समाधान आणि डॉक्टर-नर्सेसच्या मनातील सेवाभाव, या सगळ्यांनी वातावरण अधिक भावनिक आणि प्रेरणादायी झाले. आजाराशी लढणाऱ्या प्रत्येक रुग्णाला या सणाने एक नवा मानसिक बळ दिलेले आहे.
जिल्हाशल्यचिकित्सक पुरुषोत्तम पटले म्हणाले “मानवतेचे मूल्य हेच आपले सर्वात मोठे बळ आहे. आरोग्य विभाग या मूल्यांच्या जोपासनेसाठी आणि लोकांच्या आरोग्य सुधारण्यासाठी सातत्याने कार्यरत आहे. असे सण साजरे करून आपण रुग्णांच्या मनाशी जोडले जातो.” या वेळी
वैद्यकीय अधिकारी डॉ सुवर्णा हुबेकर यांनी सांगितले “राखी पौर्णिमा ही केवळ धाग्याची नाही तर संरक्षणाच्या वचनाची परंपरा आहे. येथे आम्ही डॉक्टर व नर्सेस म्हणून रुग्णांचे संरक्षण करत आहोत – हीच आमची खरी राखी आहे.”
दंत शल्यचिकित्सक डॉ ज्योती राठोड यांनी रुग्णांना राखी बांधून सांगितले – “राखी हा सण केवळ हृदयाचे बंध घट्ट करतो असे नाही, तर स्मितरेषाही वाढवतो. आम्ही आमच्या कामातून आणि या उत्सवातून लोकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्यासाठी कार्यरत आहोत. मौखिक आरोग्य हेही आरोग्यसेवेचा महत्त्वाचा भाग आहे आणि हे स्मित हास्याचे संरक्षण करण्याचे आमचे ध्येय आहे.”
या उपक्रमात शुश्रुषा संवर्गाने दिपाली वानखेडे आणि अधिपरिचारका सावरकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष उत्साहाने सहभाग घेतला. प्रत्येक स्टाफ ने रुग्णांशी आपुलकीने बोलून, त्यांची काळजी घेत, जणू मोठ्या बहिणीसारखे प्रेम दिले. त्यांची सततची सेवा आणि मायेची ऊब हेच सिव्हिल हॉस्पिटलचे खरे वैशिष्ट्य आहे.
या उपक्रमातून एक संदेश स्पष्ट झाला – आजारांवर उपचार फक्त औषधांनीच होत नाहीत, तर प्रेम, माया आणि मनापासूनची काळजीही तेवढीच गरजेची आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ पुरुषोत्तम पटले यांनी राखी पौर्णिमेला दिलेला हा नवा अर्थ प्रत्येकासाठी प्रेरणादायी ठरला.
कार्यक्रमाचे आयोजन समुपदेशिका नीतू फुले आणि श्री भंडारकर यांनी केले.


Pingback: अल्पसंख्याक समाजाच्या प्रगतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस कटिबध्द : आ. नायकवाडी - Navchaitanya