LatestNewsगोंदिया- भंडारामहाराष्ट्रविदर्भ

उमरखेड: गोवंश तस्करांचा पाठलाग करणाऱ्या गोरक्षकाची निर्घृण हत्या; दगड व लाकडाने ठेचून मारले

उमरखेड (यवतमाळ): अवैध गोवंश वाहतूक करणाऱ्या पिकअप वाहनाचा पाठलाग करणाऱ्या एका ठेकेदाराची दगड आणि लाकडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (२३ मे) रात्री घडली. या घटनेमुळे उमरखेड आणि महागाव तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. गजानन मारोती सुरोशे (वय ३४, मूळ रा. वडद, ता. महागाव, सध्या रा. बोरबन, उमरखेड) असे या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी उमरखेड पोलिसांनी पिकअप चालक आणि त्याच्या साथीदारांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतक गजानन सुरोशे हे व्यवसायाने ठेकेदार होते. शुक्रवारी ते किनवट येथून प्रसाद बाभळे या मित्रासोबत साईट पाहून परतत होते. त्यावेळी बिजोरा टोल नाक्याजवळून (MH 29 BE 8915) या पिकअप वाहनातून गोवंशाची अवैधरित्या वाहतूक होत असल्याची माहिती गोरक्षकांना मिळाली होती. पिकअप चालकाने टोल नाक्यावर वाहन न थांबवता थेट टोल गेट तोडून उमरखेडच्या दिशेने पळ काढला.
पिकअपने पळ काढल्यानंतर सुरुवातीला महेश सुरोशे व इतर गोरक्षकांनी दुचाकीवरून पाठलाग सुरू केला. मात्र, घाटात पिकअप चालकाने त्यांना कट मारल्याने ते दुचाकीसह डिव्हायडरवर आदळले. त्यानंतर गजानन सुरोशे यांनी आपल्या एस-क्रॉस (MH 12 PT 8634) कारने धाडसाने या वाहनाचा पाठलाग सुरू ठेवला. मृताचा भाऊ ज्ञानेश्वर मारोती सुरोशे यांच्या फिर्यादीवरून उमरखेड पोलिसांनी मुख्य आरोपी शेख सुल्तान आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे आणि संतापाचे वातावरण असून, पोलीस पसार झालेल्या आरोपींचा कसून शोध घेत आहेत. घटनेची माहिती मिळताच उमरखेड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी अवस्थेतील गजानन यांना सुरुवातीला उमरखेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना नांदेड येथील यशोसाई रुग्णालयात हलवण्यात आले. तिथे तपासणीअंती डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
सुकळी गावानजीक भीषण हल्ला
गजानन पाठलाग करत सुकळी (ज.) गावानजीक पोहोचले. तिथे एका शेतात पिकअप थांबवून, चालक शेख सुल्तान शेख अल्लावली (रा. सुकळी ज.) आणि त्याच्या अज्ञात साथीदारांनी वाहनातून खाली उतरून गजानन यांच्या कारवर पुढून व मागून मोठे दगड व लाकडांनी भीषण हल्ला चढवला. या हल्ल्यात गजानन गंभीर जखमी झाले. गजानन यांना रक्ताच्या थारोळ्यात पाडल्यानंतर, आरोपींनी पिकअपमधील अंदाजे ११ ते १२ गोवंश जनावरे तिथेच उतरवली आणि अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *