कळमनुरीत जुन्या वादातून तरुणाचा दगडाने ठेचून निर्घृण खून; सहा जणांवर गुन्हा, चौघांना अटक
कळमनुरी (हिंगोली): शहरातील साईनगर परिसरात जुन्या भांडणाच्या वादातून एका २३ वर्षीय तरुणाचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (२३ मे) रात्री घडली. या थरारक घटनेमुळे कळमनुरी शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवत सहापैकी चार आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. नवनाथ शिवाजी बेद्रे (वय २३, रा. पाटील गल्ली, कळमनुरी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी मयताचे वडील शिवाजी ग्यानबारात बेद्रे यांनी कळमनुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री ८:४० वाजेच्या सुमारास साईनगर येथील कपिल बारच्या बाजूला असलेल्या रेतीच्या ढिगाऱ्याजवळ ही घटना घडली. जुन्या वादातून आरोपींनी संगनमत करून नवनाथला जिवे मारण्याचा कट रचला. त्याला गाठून आरोपींनी त्याच्या डोक्यात थेट दगडाने सपासप वार केले, ज्यामध्ये नवनाथचा जागीच मृत्यू झाला.
फिर्यादीनुसार, पोलिसांनी अमर बबनराव शिंदे, परमेश्वर ऊर्फ बंटी हरिभाऊ जाधव, भारत शंकरलाल यादव, दुर्गेश लक्ष्मणराव गाभणे, आकाश विठ्ठलराव सातव आणि सुरेश विठ्ठलराव सातव (सर्व रा. कळमनुरी) या सहा जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक प्रेमप्रकाश माकोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, यापैकी चार आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, फरार असलेल्या दोन आरोपींचा कसून शोध सुरू आहे. त्यांनाही लवकरच गजाआड केले जाईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक संतोष इंगळे करत आहेत. भरवस्तीत घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांची घटनास्थळी धाव
घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. निलभ रोहन, पोलीस उपाधीक्षक कुंदन कुमार वाघमारे, कळमनुरीचे पोलीस निरीक्षक प्रेमप्रकाश माकोडे, आखाडा बाळापूरचे पोलीस निरीक्षक विष्णूकांत गुठे, सहायक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे, उपनिरीक्षक रोहीणकर, गजानन होळकर यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या (Forensic) पथकाने तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. बिट जमादार व इतर पोलीस कर्मचाऱ्यांनीही बंदोबस्त ठेवला होता.

