गांधीवाद हाच भारताच्या शास्वत विकासाचा मार्ग – प्रा. नवीन शर्मा
नमाद महाविद्यालयात ‘महात्मा गांधी यांचा वारसा’ वर व्याख्यान
गोंदिया : आज जगभरात विकासाचे नवनवे मॉडेल तयार केले जात आहेत. त्याने विकास जरी होत असला तरी तो विनाशाकडे नेणारा आहे. महात्मा गांधी यांनी सांगितलेला मार्ग सर्वागीण विकासाचा असून तो स्थायी स्वरूपाचा आणि चिरकाल टिकणारा आहे. त्यामुळे आज जग महात्मा गांधी यांच्या विचारांकडे आकृष्ट होत आहेत. भारताला सर्वागीण विकास साधायचा असेल तर महात्मा गांधी यांनी सांगितलेल्या मार्गावरूनच मार्गक्रमण करावे लागेल, असे प्रतिपादन शासकीय महाविद्यालय चोक्वीमनियार, हिमाचल प्रदेशचे इतिहासाचे प्राध्यापक नवीन शर्मा यांनी केले.
गोंदिया शिक्षण संस्थेचे मार्गदर्शक प्रफुल पटेल, अध्यक्षा वर्षा पटेल, सचिव राजेंद्र जैन, संचालक निखिल जैन यांच्या मार्गदर्शनात प्राचार्य डॉ. रवींद्र मोहतुरे यांच्या नेतृत्वात गोंदिया शिक्षण संस्था द्वारा संचालित येथील नटवरलाल माणिकलाल दलाल महाविद्यालयात ‘महात्मा गांधी यांचा वारसा’ या विषयावर मार्गदर्शन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रा. नवीन कुमार शर्मा बोलत होते. कार्यक्रमाला मानव्य विद्या शाखा प्रमुख डॉ. एच पी पारधी, डॉ. बबन मेश्राम, प्रा. योगेश भोयर, डॉ. अंबादास बाकरे उपस्थित होते. प्रा. शर्मा पुढे म्हणाले, महात्मा गांधी यांनी १९०९ साली लिहिलेल्या हिंद स्वराज आणि माझे सत्याचे प्रयोग या पुस्तकात आपल्या विचारांची मांडणी केली आहे. पुढे इतरही ठिकाणी मांडलेले विचार देशाचा मूलभूत सर्वागीण विकास साधण्यास प्रेरक आहेत. नामदार गोखले यांच्या सूचनेनुसार गांधीजींनी संपूर्ण भारतभ्रमण केले. त्यामुळे गांधीजींनी भारताची नाडी अचूक ओळखली होती. म्हणून भारताच्या विकासासाठी गांधीवाद हाच शाश्वत विकासाचा मार्ग आहे. महात्मा गांधींच्या विचारांना टाळून साधलेला विकास विनाशाकडे घेऊन जाईल, असे सांगितले. विद्यार्थ्यांनी प्लास्टिकचा वापर टाळावा, नेहमी सत्य बोलावे, असे केल्याने त्यांच्यात आत्मबल वाढेल असे प्रा. शर्मा यांनी ठामपणे सांगितले.
शिक्षण महर्षी मनोहरभाई पटेल यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन डॉ. अंबादास बाकरे, प्रास्ताविक प्रा. योगेश भोयर तर आभार प्रा. घनशाम गेडेकर यांनी मानले. कार्यक्रमाला डॉ. शशिकांत चौरे, डॉ. मस्तान शाह, डॉ. संतोष होतचंदानी, डॉ. प्रियदर्शना नंदेश्वर, प्रा. नीलकंठ भेंडारकर, प्रा. संकेत सहारे, प्रा. विशाल बडोले, प्रा. शैलेश गुप्ता, प्रा. रितेश चौरावार, प्रा. बाजपेयी, प्रा. हट्टेवार उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी इतिहास विभागाच्या प्राध्यापकांनी परिश्रम घेतले.

