nagpur winter session 2025 : विदर्भ व मराठवाड्यातील सिंचनाचा अनुशेष कमी करण्यात यश : मुख्यमंत्री फडणवीस
नागपूर : विदर्भ आणि मराठवाड्यातील 13 लाख 83 हजार हेक्टरचा सिंचन अनुशेष जवळपास संपुष्टात आला आहे, असे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, इंडिकेटर बॅकलॉग समितीने निश्चित केलेल्या या अनुशेषापैकी 13 लाख 34 हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्यात आले असून, आता केवळ 49 हजार हेक्टरचा अनुशेष शिल्लक आहे. हा अनुशेष प्रामुख्याने अकोला, बुलढाणा आणि हिंगोली या तीन जिल्ह्यांपुरता मर्यादित आहे. अकोल्यात उर्वरित 14,530 हेक्टरच्या अनुशेषाच्या बदल्यात 2026-27 पर्यंत 19,335 हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार असून, बुलढाण्यात 29 हजार हेक्टरच्या अनुशेषाविरुद्ध 1 लाख 68 हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. (nagpur winter session 2025) विशेषतः झीगाव प्रकल्पासाठी यंदा 2,399 कोटींची तरतूद करण्यात आली असून, या एका प्रकल्पामुळे बुलढाणा जिल्हा अनुशेषातून थेट अधिशेषात जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पूर्व विदर्भाची जीवनरेखा मानल्या जाणाऱ्या गोसीखुर्द प्रकल्पाचे वाढीव काम अंतिम टप्प्यात असून, एकूण 2.54 लाख हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार आहे. त्यासाठी 1,555 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असून, जून 2027 पर्यंत काम पूर्ण होणार आहे. विदर्भात एकूण 485 सिंचन प्रकल्पांपैकी बहुतांश पूर्ण झाले असून, उर्वरित 74 प्रकल्पांतून 7.66 लाख हेक्टर अतिरिक्त क्षमता तयार होणार आहे. (nagpur winter session 2025) याशिवाय 1 लाख कोटींच्या वैनगंगा–नळगंगा महाप्रकल्पामुळे 4.04 लाख हेक्टर जमीन ओलिताखाली येणार असून, फेब्रुवारी 2026 पर्यंत सर्व मान्यता प्रक्रिया पूर्ण होण्याचे लक्ष्य आहे. मराठवाड्यासाठी दमणगंगा–नारपार–गिरणा पाणी वळवणे तसेच कोल्हापूर–सांगलीतील पुराचे पाणी उजनीपर्यंत नेणाऱ्या फ्लड डायव्हर्जन प्रकल्पांमुळे दुष्काळ कायमचा दूर होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
——————————————-
कनेक्टिव्हिटीवर भर
नागपूर-गोवा शक्तिपीठ द्रुतगती महामार्गामुळे प्रवासाची वेळ आठ तासांवर येणार असून या महामार्गामुळे मराठावाड्याचे चित्र पालटणार आहे. तसेच नवीन प्रस्तावित मुंबई-कल्याण-लातूर जन कल्याण द्रुतगती महामार्ग जाहीर करण्यात आला आहे. यामुळे लातूर ते मुंबई प्रवास केवळ 4.5 तासांवर येणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. राज्यात मेट्रो आणि पायाभूत सुविधांच्या कामांना गती देण्यात आली असून सध्या मुंबईत ९१ किलोमीटर लांबीची मेट्रो सेवा कार्यरत आहे. या मार्गांवरून दररोज सुमारे ९ लाख ५० हजार प्रवासी प्रवास करत आहेत. (nagpur winter session 2025) पुढील दोन वर्षांत या कार्यरत लांबीमध्ये आणखी १३२ किलोमीटरची भर पडणार असून पुण्यात ३३ किलोमीटर मेट्रो मार्ग सुरू असून त्याचा लाभ दररोज २.२३ लाख प्रवासी घेत आहेत. पुण्यात आणखी ४५ किलोमीटरचे काम प्रगतीपथावर असून त्यातील २७ किलोमीटर पुढील दीड वर्षात पूर्ण करण्याचे नियोजन आहे. नागपूरमध्ये ४० किलोमीटर मेट्रो मार्ग पूर्ण झाला असून रोज १.१० लाख प्रवासी त्याचा वापर करत आहेत, तर ४३ किलोमीटरचा नवा टप्पा पुढील दोन वर्षांत पूर्ण केला जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिली.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मुंबईतील इतर महत्त्वाच्या पायाभूत प्रकल्पांनाही वेग देण्यात आला आहे. ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह भुयारी मार्ग, उत्तर सागरी किनारा मार्ग, वांद्रे ते वर्सोवा, वर्सोवा-दहिसर आणि दहिसर-भाईंदर रस्ता यासह भाईंदर उत्तर ते विरार सागरी मार्गाला मान्यता देण्यात आली आहे. ठाणे–बोरिवली भुयारी मार्ग, गोरेगाव–मुलुंड लिंक रोड, उलवे सागरी किनारा मार्ग, अटल सेतू इंटरचेंज तसेच ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पांचे काम अंतिम टप्प्यात आहे. (nagpur winter session 2025) याशिवाय पुण्याच्या चक्राकार मार्गाच्या कामालाही सुरुवात करण्यात आली असून, या सर्व प्रकल्पांमुळे राज्यातील शहरी वाहतूक व्यवस्था अधिक गतिमान होण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
‘अमृतकाल रस्ते योजने’अंतर्गत रस्त्यांचा दर्जा, वाहतूक, मुख्य केंद्रांशी जोडणी यांचा विचार करून योजनेनुसार रस्ते विकास केला जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. समृद्धी महामार्गाच्या विस्ताराअंतर्गत नागपूर–गोंदिया 162 कि.मी. द्रुतगती महामार्गासाठी 18,539 कोटी रुपयांचा प्रकल्प अंतिम टप्प्यात असून, जमीन संपादन पूर्ण होताच नागपूरहून गोंदियाचा प्रवास अवघ्या सव्वा तासात शक्य होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
——————————————-
पुनर्विकासाला गती
शहरी पुनर्विकासाला गती देताना बीडीडी चाळ, जीटीपी नगर, बांद्रा रिक्लमेशन, आदर्श नगर, मोतीलाल नगर आणि एसव्हीपी नगर अशा विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पुनर्वसनासह नव्या बांधकामांना चालना देण्यात येत आहे. भोगवटा प्रमाणपत्र प्रलंबित इमारतींसाठी अभय योजना लागू करण्यात आली आहे. स्वयंपुनर्विकासासाठी अधिमूल्य कमी करण्यात आले असून, कामाठीपुरा येथील 339 इमारतींच्या पुनर्विकास प्रस्तावालाही टेंडर प्रक्रियेनंतर मंजुरी देण्यात आली आहे. तसेच मुंबईतील जुन्या व मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त इमारतींच्या पुनर्विकासासाठी नवे धोरण जाहीर करून स्वयंपुनर्विकासाला चालना देण्यात आली असून, सध्या सुमारे 1,600 इमारतींचा पुनर्विकास या योजनेंतर्गत सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले.
——————————————-
कायदा आणि सुव्यवस्था बळकटीकरणावर भर
(nagpur winter session 2025) विधानसभेत गृह विभागावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी राज्यातील कायदा-सुव्यवस्थेची आकडेवारी सादर केली. ऑक्टोबर २०२४ ते ऑक्टोबर २०२५ या कालावधीत पुण्यात गुन्ह्यांची घट झाल्याची माहिती दिली. नवीन फौजदारी कायदे लागू झाल्यानंतर दोषसिद्धीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढून ९६.२४ टक्क्यांपर्यंत पोहोचल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. डायल ११२ सेवेचा प्रतिसाद वेळ १५ मिनिटांवरून सुमारे ७.३७ मिनिटांपर्यंत कमी झाल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
महिला व बालकांवरील गुन्ह्यांबाबत बोलताना तक्रारींच्या नोंदीचे प्रमाण ९९ टक्क्यांहून अधिक असल्याचे सांगून महिलांवरील गुन्ह्यांमध्ये ६० दिवसांत चार्जशीट दाखल करण्याचा दर ऑक्टोबर २०२५ पर्यंत ८७.८ टक्क्यांपर्यंत वाढल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. ‘ऑपरेशन मुस्कान’ आणि ‘ऑपरेशन शोध’च्या माध्यमातून हजारो हरवलेल्या महिला व बालकांचा शोध घेण्यात आले आहे. अपहरणाच्या नोंद झालेल्या प्रकरणांपैकी राज्यात सुमारे ८६ टक्के व्यक्ती एका वर्षात सापडतात, तर मुंबईत हा दर ९९ टक्क्यांपर्यंत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. सायबर गुन्हे, अमली पदार्थ आणि संघटित गुन्हेगारीविरोधातही कारवाई तीव्र केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ‘महासायबर’च्या माध्यमातून सायबर फसवणूक, फेक कॉल सेंटर्स आणि डिजिटल अरेस्टसारख्या गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यात येत असून महासायबर हे देशातील सर्वात आधुनिक सायबर हेडक्वार्टर ठरले आहे. अनेक राज्यांनी आणि दोन देशांनी सहकार्यासाठी विनंती केली आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. अमली पदार्थांविरोधात झिरो टॉलरन्स धोरण राबवले जात असून, पेडलर्सवर मोका व एमपीडीए अंतर्गत कठोर कारवाई केली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गेल्या दहा वर्षांत ८८ हजारांहून अधिक पोलिस भरती झाल्याची माहिती देत, गुन्हेगारांविरोधात कठोर कारवाई सुरूच राहील, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तराचा समारोप करताना, महाराष्ट्र आता थांबणार नाही, सर्वांच्या सहकार्याने महाराष्ट्र आपल्याला पुढेच न्यायचा आहे, असे सांगितले.

