LatestNewsगोंदिया- भंडारामहाराष्ट्रविदर्भ

४२ अंशाचा पारा अन् रात्री वीज गायब; महावितरणच्या ओव्हरलोडचा छळ

दिवसा उन्हाचा तडाखा, रात्री महावितरणचा ‘झटका’; देवरीकर घामाघूम
देवरी । तालुका प्रतिनिधी

देवरी तालुक्यात सध्या कडाक्याच्या उन्हाचा तडाखा जाणवत असून तापमानाचा पारा ४२ अंशावर पोहोचला आहे. अशा भीषण उष्णतेत नागरिक हैराण झाले असतानाच, महावितरणच्या ढिसाळ नियोजनामुळे रात्रीच्या वेळी वीजपुरवठा खंडित होत असल्याने देवरीकरांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. ओव्हरलोडमुळे फिडर बंद पडण्याचे प्रमाण वाढल्याने देवरी शहर व परिसरातील जनता रात्रीच्या वेळी घामाघूम होत आहे.
शनिवारी (दि. १८) रात्री अचानक वीजपुरवठा खंडित झाल्याने हजारो नागरिकांना अंधारात राहावे लागले. देवरी उपकेंद्राचे फिडर वाढत्या वीज मागणीचा भार सोसवेनासे झाल्याने ओव्हरलोड होऊन बंद पडले. रात्री १२.३० च्या सुमारास देवरी व मुल्ला येथील फिडर बंद पडल्यानंतर प्रशासनाने पर्यायी व्यवस्था म्हणून भार दुसर्‍या फिडरवर वळवला, मात्र काही वेळातच तोही फिडर ओव्हरलोड होऊन रात्री १.०० वाजता बंद पडला. यामुळे संपूर्ण देवरी शहर काळाखात बुडाले होते.
वीज खंडित झाल्याची माहिती मिळताच महावितरणच्या अभियंत्यांनी व कर्मचार्‍यांनी बिघाड शोधण्यासाठी दोन्ही फिडरवर पेट्रोलिंग सुरू केली. रात्रीच्या गडद अंधारात बॅटरीच्या उजेडात तंत्रज्ञांनी प्रत्येक खांब तपासला. अखेर अथक परिश्रमानंतर जंप तुटल्याचे निदर्शनास आले आणि दुरुस्तीनंतर वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला.
…………………..
नागरिकांचा संताप आणि संतप्त सवाल
उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत असताना पंखे, कुलर आणि एसीसाठी विजेची गरज वाढली आहे. मात्र, महावितरणकडून कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय वीज खंडित केली जात असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. ‘कमी दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. हे प्रकार इन्व्हर्टर आणि बॅटरी विक्रेत्यांच्या फायद्यासाठी तर सुरू नाहीत ना?’ असा सवाल ग्राहक विचारत आहेत. वेळेवर वीज बिल भरूनही जर अशा समस्यांना सामोरे जावे लागत असेल, तर बिल का भरावे? अशी भावना आता सामान्य नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *