नरभक्षी बिबट जेरबंद; धाबेटेकडीतील दहशतीला अखेर पूर्णविराम
वन विभागाची धाडसी मोहीम यशस्वी; नागरिकांनी सोडला सुटकेचा निःश्वास
अर्जुनी-मोरगाव । प्रतिनिधी
अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील आदर्श धाबेटेकडी परिसरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या नरभक्षी बिबट्याच्या दहशतीला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. दि. १९ एप्रिल २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास वन विभागाने दुसर्या नरभक्षी बिबट्यालाही यशस्वीरित्या जेरबंद करत मोठे यश संपादन केले. या कारवाईमुळे भयभीत झालेल्या नागरिकांनी अखेर सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
धाबेटेकडी परिसरात मागील काही दिवसांपासून बिबट्यांची वाढती वर्दळ नागरिकांसाठी मोठी डोकेदुखी ठरत होती. विशेषतः दि. १० एप्रिल रोजी घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर हादरला होता. एका सहा वर्षीय बालकाला घराच्या अंगणातून उचलून नेऊन बिबट्याने ठार केल्यामुळे गावकर्यांमध्ये भीतीचे सावट अधिकच गडद झाले होते.
या घटनेनंतर वन विभागाने तात्काळ पावले उचलत सापळे लावणे, पाळत ठेवणे आणि बचाव पथक तैनात करणे अशा उपाययोजना सुरू केल्या. त्यानंतर दि. १४ एप्रिल रोजी एका बिबट्याला जेरबंद करण्यात आले होते. मात्र, परिसरात अजूनही बिबट्यांची हालचाल सुरू असल्याने नागरिकांमध्ये भीती कायम होती. अखेर १९ एप्रिल रोजी पहाटे सुमारे ५ वाजताच्या सुमारास वन विभागाने अत्यंत नियोजनबद्ध आणि धाडसी कारवाई करत दुसर्या नरभक्षी बिबट्यालाही पकडण्यात यश मिळवले. गावकर्यांच्या सतर्क सहकार्यामुळे ही मोहीम अधिक प्रभावी ठरली.
ही कारवाई गोंदिया येथील उपवनसंरक्षक पवनकुमार जोंग आणि नवेगाव-बांध येथील प्रकष्ट निष्कासन अधिकारी अविनाश मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. अर्जुनी-मोरगावचे वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्रसिंग बहुरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तसेच नवेगाव-बांध येथील शीघ्र बचाव दलाने संयुक्तपणे ही मोहीम यशस्वी केली. या कारवाईत क्षेत्र सहाय्यक प्रवीण केलवतकर, वनरक्षक सतीश शेंद्रे, अमित राऊत, पुरुषोत्तम पटले यांच्यासह बचाव दलातील सदस्यांनी मोलाची भूमिका बजावली.
बिबट्यांना जेरबंद केल्यानंतर धाबेटेकडी परिसरात पुन्हा सुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी वन विभागाच्या तत्परतेचे कौतुक केले आहे. या यशस्वी कारवाईमुळे वन्यजीव-मानव संघर्षावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाची सज्जता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

