LatestNewsगोंदियाविदर्भ

aaple sarkar : आपले सरकार पोर्टलवरील तक्रारी तातडीने निकाली काढा :  जिल्हाधिकारी प्रजित नायर

आतापर्यंत 765 तक्रारींचा निपटारा
गोंदिया :
 जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेचे दैनंदिन प्रश्न, शासन स्तरावर असलेली प्रलंबित कामे, ग्रामीण भागातील नागरिकांचे प्रलंबित प्रश्न, समस्या, आर्थिक फसवणूक आदी संदर्भात प्राप्त होणाऱ्या सर्व अर्जांवर तातडीने कार्यवाही करुन निपटारा करण्यासाठी ‘‘आपले सरकार तक्रार निवारण पोर्टल’’ तयार करण्यात आले आहे. त्यामुळे (aaple sarkar) आपले सरकार पोर्टलवर दिसून येत असलेल्या तक्रारी संबंधित विभागाने तातडीने निकाली काढावे, असे निर्देश जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज (ता.24) आपले सरकार पोर्टलवरील तक्रारी निकाली काढण्याबाबत आढावा घेण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. सभेला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम, परिविक्षाधीन आय.ए.एस. अधिकारी साईकिरण नंदाला, निवासी उपजिल्हाधिकारी भैय्यासाहेब बेहेरे, आपले सरकार पोर्टलचे जिल्हा प्रकल्प अधिकारी हरिचंद्र पौनीकर यांचेसह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी  नायर म्हणाले, आपले सरकार पोर्टल हे महाराष्ट्र शासनाने नागरिकांसाठी विविध तक्रारी नोंदविण्यासाठी उपलब्ध करुन दिले आहे. कोणत्याही शासकीय कार्यालयात कामासाठी विलंब होणे, प्रमाणपत्रे वेळेत न मिळणे, शासकीय योजनांमध्ये होणारा अडथळा किंवा अनुदान वितरणातील त्रुटी, स्थानिक प्रशासनाशी संबंधित तक्रारी जसे- पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, रस्त्यांची दुरुस्ती, गटार साफसफाई, वीजपुरवठा खंडीत होणे, चुकीचे देयके येणे, शासकीय रुग्णालये आणि आरोग्य केंद्रातील सुविधा उपलब्ध नसणे, शाळा-महाविद्यालयातील प्रशासनीक अडचणी अशा विविध सार्वजनिक सेवांशी निगडीत तक्रारी दाखल केल्या जातात. त्यामुळे सर्व विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष्य देवून आपले सरकार पोर्टलवरील प्रलंबित प्रकरणे त्वरित निकाली काढावे असे त्यांनी सांगितले.
यावेळी आपले सरकार पोर्टलचे जिल्हा प्रकल्प अधिकारी हरिचंद्र पौनीकर यांनी (aaple sarkar) आपले सरकार पोर्टलवर आपल्या विभागाची युझर आयडी कशी तयार करावी, युझर आयडीचा पासवर्ड कसा तयार करावा. सदर पोर्टलमध्ये आपल्या विभागाची माहिती कशी भरायची याबाबत संगणकीय प्रणालीद्वारे सविस्तर माहिती विशद केली. आतापर्यंत (aaple sarkar) आपले सरकार पोर्टलवर 868 तक्रारी प्राप्त झाल्या, त्यापैकी 765 तक्रारींचा निपटारा करण्यात आला असे त्यांनी सांगितले. यासोबतच जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापन करण्यात आलेल्या मुख्यमंत्री सचिवालय कक्षात प्रलंबित असलेल्या तक्रारींचा त्वरित निपटारा करण्यात यावा. राजीव गांधी प्रशासकीय गतीमान अभियानांतर्गत आपल्या विभागामार्फत नाविन्यपूर्ण योजना राबविली असेल तर त्या योजनेची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात यावी. त्यावर बक्षिस सुध्दा ठेवण्यात आले आहे. तसेच दिनांक 19 ते 25 डिसेंबर 2025 पर्यंत सुशासन सप्ताह राबविण्यात येत आहे, त्याचप्रमाणे “प्रशासन गाँव की ओर” उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये सर्व विभागांनी सहभागी होवून जनतेला स्वच्छ व पारदर्शक शासकीय सेवांचा लाभ दयावा, असे निवासी उपजिल्हाधिकारी भैय्यासाहेब बेहेरे यांनी सांगितले.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *