tiroda News : प्रशासनाचा निष्काळजीपणा; शाळेचा गेट कोसळून विद्यार्थिनीचा मृत्यू
तिरोडा नगर परिषदेच्या शाळेतील हृदयद्रावक घटना
प्रज्ञा शोध परीक्षेत राज्यात चौथी आलेल्या निराली चाफलेचा अंत
तिरोडा (प्रतिनिधी) : येथील नगर परिषद संचलित ‘पीएम श्री राणी अवंतीबाई प्राथमिक शाळा’, लोधीटोला येथे शनिवारी दुपारी प्रशासनाच्या दिरंगाईचा एक भयावह चेहरा समोर आला. शाळेचा जीर्ण झालेला मुख्य लोखंडी गेट अंगावर कोसळल्याने इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या कु. निराली मनीष चाफले (वय ११ वर्षे) या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे, ज्या शाळेत ही घटना घडली, त्याच शाळेत निरालीची आई मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. या घटनेमुळे संपूर्ण तिरोडा (tiroda News) तालुक्यात संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शाळेचा मुख्य गेट बराच काळापासून गंजलेल्या आणि जीर्ण अवस्थेत होता. शाळा प्रशासनाने या गेटच्या दुरुस्तीचा प्रस्ताव नगर परिषदेकडे सादर केला होता, मात्र त्यावर कोणतीही ठोस कार्यवाही झाली नाही. शनिवार, ११ एप्रिल रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास शाळा सुटल्यानंतर विद्यार्थी बाहेर पडत होते. निरालीने गेट ओढला असता तो अचानक निखळून तिच्या अंगावर कोसळला. लोखंडी गेटच्या वजनाखाली दबल्या गेल्याने ती गंभीर जखमी झाली. तिला तातडीने (tiroda News) तिरोडा येथील खाजगी रुग्णालय व त्यानंतर प्रकृती खालावल्याने गोंदियाला नेण्यात आले, परंतु दुर्दैवाने वाटेतच तिने अखेरचा श्वास घेतला. (tiroda News) निराली ही अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्तेची विद्यार्थिनी होती. नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय प्रज्ञा शोध परीक्षेत तिने महाराष्ट्रातून चौथा क्रमांक पटकावून शाळेचा आणि जिल्ह्याचा नावलौकिक वाढवला होता. काही दिवसांपूर्वीच तिचा पुणे येथे भव्य सत्कारही करण्यात आला होता. एका तेजस्वी कारकीर्दीची सुरुवात होण्यापूर्वीच प्रशासकीय निष्काळजीपणामुळे तिचा असा अंत झाल्याने नागरिक संतप्त झाले आहेत.
………………………………….
दुरुस्तीचे निर्देश दिले होते, पण…
सामाजिक कार्यकर्त्या शितल तिवडे यांना या गेटच्या धोकादायक स्थितीबद्दल माहिती मिळताच, त्यांनी शुक्रवारीच वेल्डिंग करून दुरुस्ती करण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या होत्या. मात्र, नियोजित दुरुस्ती होण्यापूर्वीच अवघ्या काही तासांत हा अपघात घडला. “वेळेत दुरुस्ती झाली असती तर आज निराली आपल्यात असती,” अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी दिली आहे.

