अमृतच्या लक्षित गटातील परिवार सर्वेक्षण कार्यक्रम आयोजनउमेदवारांच्या सर्वांगिण उन्नतीसाठी विविध योजना
भंडारा : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे ज्या खुल्या प्रवर्गातील जातींना कुठल्याही स्वतंत्र शासकीय विभाग/संस्था /महामंडळांमार्फत योजनांचा लाभ मिळत नाही, अश्या गटातील आर्थिक दुर्बल घटकातील युवक-युवती व इतर उमेदवारांच्या सर्वांगिण उन्नतीसाठी व सक्षमीकरणासाठी विविध योजना व उपक्रम इ. राबविण्यात येतात.अमृतच्या लक्षित गटामध्ये खुल्या प्रवर्गातील सद्यस्थितीत पुढील जातीचा समावेश आहे. (सर्वेक्षणाअंती आणखी यात वाढ होण्याची शक्यता आहे ब्राहमण, बनिया, सिंधी, मारवाडी, गुजराती, पटेल, पाटीदार, आर्य वैश्य कोमटी, राजपूत, राजपुरोहित, बंगाली, कायस्थ, नायडू, नायर, ठाकूर, त्यागी, जाट, ऐयांगर, सेनगुंबर, बेलमार, कानबी, कम्मा, भूमीहार, हिंदू नेपाली, लोहाना ई. अश्या २५ जातींचा समावेश आहे.सद्यस्थितीमध्ये अमृत संस्थे मार्फत लक्षित गटाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी विविध योजनाची अंमलबजावणी करण्यात येते. यात मुख्यत्वे पुढील योजनांचा समावेश आहे. १. व्यक्तिमत्व विकास, २. औद्योगिक व उन्नत कौशल्य विकास, ३. रोजगारक्षम कौशल्य विकास, ४. उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक अर्थसाह्य, ५. स्पर्धा परीक्षा प्रोत्साहन, ६. वैयक्तिक व्याज परतावा योजना (उद्योग व्यवसाय वृद्धीसाठी) इत्यादी योजनांचा समावेश असून यामध्ये लक्षित गटाच्या सर्वागीण विकासासाठी मूल्यवर्धित योजना सर्व घटकातील व वयोगटातील व लाभार्थ्यांसाठी तयार करण्याचा मानस आहे.यासाठी लक्षित गटातील कुटुंबाची संख्या निश्चित करणे, त्यांच्या अपेक्षा जाणून घेणे, उपलब्ध स्थानिक संसाधने, उपलब्ध कौशल्य व आवडीनुसार विविध योजना तयार करण्यासाठी अमृत संस्थेकडून राज्य पातळीवर जिल्ह्यातील सर्व लक्षित गटातील कुटुंबांचे लक्षित गटातील परिवाराचे सर्वेक्षण केले जाणार आहे. सर्वेक्षणाचा कालावधी दि. ८ एप्रिल २०२६ ते २५ एप्रिल २०२६ दरम्यान महाराष्ट्रातील सर्व ३६ जिल्ह्यात राबवले जाणार आहे. आवश्यकता वाटल्यास हा कालावधी अजून काही दिवसांसाठी वाढविण्यात येईल.या कालावधीत अमृत संस्थेचे प्रतिनिधी अमृत मित्र श्री. हेमंत चंदवासकर, अमृत सखी कु. साक्षी जोशी, जिल्हा व्यवस्थापक श्री. ओमकार हरदास थेट ग्रामपंचायत पातळीवर लक्षित गटाशी संपर्क करणार आहेत. लक्षित गटातील विविध सामाजिक संस्था, संघटना, मंडळे यांच्याकडून सुद्धा त्या संबंधित समाजातील प्रतिनिधी/ प्रतिष्ठित व्यक्ती/ पदाधिकारी/ अशा व्यक्तींची प्रातिनिधिक स्वरूपामध्ये माहिती घेतली जाणार आहे. त्याचप्रमाणे अमृतच्या लक्षित गटात मोडणार्या कुटुंबातील व्यक्ती, संस्था, संघटना, मंडळे इत्यादी यांनी या कालावधीत अमृतच्या जिल्हा व्यवस्थापक/ विभागीय व्यवस्थापक इत्यादी अमृतच्या प्रतिनिधींशी संपर्क करून आपल्या परिवाराची, संस्था / संघटना / समाजाची माहिती देऊ शकता व अमृत संस्थेमार्फत सध्या राबविण्यात येणार्या विविध योजनांची माहिती घेऊ शकता.या माध्यमातून लक्षित गटातील जास्तीत जास्त कुटुंबापर्यंत अमृत संस्थेच्या विविध योजना व उपक्रमाची माहिती पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. तसेच, अमृत संस्थेकडून सर्वागीण विकासाच्या आणखी कोणकोणत्या उपाययोजना/उपक्रम राबविणे अपेक्षित आहे याबद्दल विविध व्यक्तींची मते समजावून घेणे व त्या आधारावर नवीन आवश्यक त्या योजना तयार करणे असा दुहेरी हेतू या सर्वेक्षणातून साध्य करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे भविष्यामध्ये अमृत या संस्थेमार्फत वेळोवेळी राबविण्यात येणार्या विविध योजना/ उपक्रम याची माहिती वेळोवेळी या संपर्क क्रमांकाच्या माध्यमातून सर्व संबंधितांपर्यंत पोहोचवण्याचा मानस आहे. तरी अमृत परिवार सर्वेक्षण व ग्राम सर्वेक्षण अभियानास लक्षित गटातील जास्तीत जास्त व्यक्तींनी सक्रिय सहकार्य करावे व अचूक माहिती देऊन शासनाच्या योजनांचा लाभ आपल्या कुटुंबापर्यंत पोहोचविण्यास हातभार लावावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक श्री. ओमकार मिलिंदराव हरदास यांच्या मार्फत करण्यात येत आहे. अधिक माहिती करिता भंडारा जिल्हा अमृत प्रतिनिधी संपर्क क्रमांक ९११२२२८७७५, ८८५७९३४७३२, ९३२५१७३४४५, ८६०५९८४३५८.
